बीड : प्रजापत्र नेटवर्क
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या सूचनेनुसार बीड जिल्हाभरात राबवण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत, शिवाजीनगर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत हरवलेले आणि चोरीस गेलेले तब्बल २३ मोबाईल फोन शोधून काढले आहेत. तांत्रिक तपासाच्या आधारे हस्तगत करण्यात आलेले हे सर्व मोबाईल अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिवाजीनगर पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचे मोबाईल हरवण्याच्या तसेच चोरीस जाण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. या पार्श्वभूमीवर, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि अंमलदारांनी अत्यंत कौशल्याने आणि अचूक तांत्रिक तपासाचा (Technical Investigation) वापर करून २३ मोबाईल फोनचा शोध लावला.
सोमवारी (दि. ५ ऑक्टोबर) हे सर्व मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. आपला हरवलेला आणि चोरीला गेलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आणि समाधान व्यक्त केले.
गर्दीच्या ठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन
नागरिकांचे मोबाईल हरवण्याच्या किंवा चोरीस जाण्याच्या घटना प्रामुख्याने गर्दीच्या ठिकाणी घडतात. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना आपल्या मौल्यवान वस्तू व मोबाईल फोनची दक्षतापूर्वक काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान वस्तू घेऊन जाणे टाळावे, असा सल्लाही पोलिसांनी दिला आहे. सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, तसेच पोलीस अंमलदार दिलीप राठोड आणि अशोक राडकर यांनी पार पाडली.

