बीड : प्रजापत्र नेटवर्क
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बहुचर्चित विलास घुले हत्या प्रकरणात (Vilas Ghule Murder Case) आता एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर वळण आले आहे. खासदार बजरंग सोनवणे (MP Bajrang Sonawane) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक खळबळजनक आरोप करत जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. आपला मुलगा सौरभ सोनवणे (Saurabh Sonawane) याला या गुन्ह्यात जाणीवपूर्वक अडकवण्यासाठी थेट कारागृहातून कट रचला गेला असून, या कटाचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड (Valmik Karad) असल्याचे त्यांनी पुराव्यासह मांडले आहे. (Beed Crime News) या थेट आरोपामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे.
ऑडिओ क्लिपमधून कटाचा पर्दाफाश
या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी खासदार सोनवणे यांनी एक व्हायरल ऑडिओ क्लिप (Viral Audio Clip) प्रसारमाध्यमांसमोर उघड केली. या क्लिपमध्ये जेलमध्ये असलेला वाल्मीक कराड आणि बाहेर असलेला सुग्रीव कराड यांच्यातील संभाषण समोर आले आहे. वाल्मीक कराड हा जेलमधूनच सौरभ सोनवणेवर गुन्हा दाखल करण्यासाठी वाटेल ते करण्याचे आदेश देत असल्याचे यातून उघड झाले आहे. "जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह पोलीस ठाण्यासमोरून हलवायचा नाही आणि पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचे नाटक करा," अशा चिथावणीखोर सूचना या संभाषणात स्पष्टपणे ऐकू येत आहेत. महाराष्ट्र राजकारण (Maharashtra Politics) आणि स्थानिक पातळीवर या ऑडिओ क्लिपमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय होते?
२१ जून रोजी टाकळी (ता. केज) येथे विलास घुले या तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ याचा या हत्येत सहभाग असल्याचा आरोप करत मोठे आंदोलन छेडले होते. मात्र, आता समोर आलेल्या या पुराव्यांमुळे हे संपूर्ण आंदोलन वाल्मीक कराड याने जेलमधून रचलेल्या कटाचा भाग होता का? असा सवाल बीडच्या (Beed Latest News) राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
पोलीस अधीक्षकांकडे करणार तक्रार
जेलमध्ये राहून बाहेरील आंदोलनाची सूत्रे हलवणे आणि एका लोकप्रतिनिधीच्या मुलाला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करणे, ही बीड पोलीस (Beed Police) प्रशासनासाठी देखील आव्हानात्मक बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि कट रचणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. यासाठी आपण स्वतः बीड पोलीस अधीक्षक (Beed Police Superintendent) यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या नव्या खुलाशानंतर पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
वाल्मीक कराड आणि सुग्रीव कराड जेलमधील ऑडिओ क्लिप
सुग्रीव हॅलो.. बर आहे का ?
वाल्मीक कराड- सोडवाययचं ,बाहेर काढायचं की इथेच माती द्यायची रे कडू.
सुग्रीव कराड- आम्ही काय काय कराव.
वाल्मीक कराड - बाकीच्या काही गोष्टी कराव्या लागतील तुझे माझे चांगले संबंध आहे.त्या गाबड्यामुळे खुसपट घुसलं
सुग्रीव कराड - आदेश सांगा तुम्ही.
वाल्मीक कराड - आजचा आज या .....वर गुन्हा दाखल झाला पाहिजे.भगवान बाबाचं आणि खरं वंजाऱ्याचं रक्त असेल तर आजच्या गुन्हा दाखल करून घे त्याच्यावर.
सुग्रीव कराड - मढ पोलीस स्टेशन समोर ठेवणार आहोत.
वाल्मीक कराड - तुला माझ्याविषयी काही वाटत असेल, मला भाऊ मनात असशील.भगवान बाबाच्या आईची म्हणजेच माझ्या मावशीची शपथ आहे तुला त्याच्यावर कसल्याही पद्धतीत गुन्हा दाखल झाला पाहिजे.
सुग्रीव कराड - पी आय....आमचं ऐकत नाही.
वाल्मीक कराड - तुम्ही मड च उचलायच नाही.जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन पासून मड (मृतदेह) हलवायचा नाही.
पूर्वीच काही असेल तर सोडून दे राग असेल तर मनातून काढून टाक.. आपण भगवान बाबाचे अनुयायी आहोत. त्याच्यामुळे कसल्याही परिस्थित गुन्हा नोंद झाला पाहिजे.माझी तुला हात जोडून पाया पडून विनंती आहे.
सुग्रीव कराड - जी जी तुम्ही फक्त आदेश सांगा बाहेरून तो पूर्ण करतो. काही सांगा..
वाल्मीक कराड - एवढ करून घे मग सांगतो तुला.
सुग्रीव कराड - जी जी जी अण्णा
वाल्मीक कराड - काही करून गुन्हा दाखल कर ..पाण्याच्या टाकीचे ढोंग कर. आपल्याकडे काय कमी नाटक आहेत का. करायला लाव नाटक..
सुग्रीव कराड जी आण्णा जी अण्णा जी जी.

