एखादे आंदोलन उभाराने कदाचित सोपे असेल, त्याला जनतेची सहानुभूती आणि समर्थन मिळविणे मात्र कठीण, त्यातही ते आंदोलन दीर्घकाळ तावून ठेवणे म्हणजे महाकठीण. एका विशिष्ट वेळेनंतर म्हणूनच मग अशा आंदोलनांचा विचार करावा लागतो. आंदोलनातून काय मिळाले किंवा नाही, याचा लेखाजोखा प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगळा असू शकतो, मात्र एखाद्या आंदोलनाचा दीर्घकाळ किंवा अनिश्चित काळासाठी भाग बनून राहणे आंदोलनाच्या नेत्यासाठी शक्य असले तरी आंदोलनाच्या समर्थकांना ते शक्य नसते. म्हणूनच ज्या आंतरवली सराटीने मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी खूप मोठे योगदान दिले, तेथून त्यांच्या आंदोलनाचा मंडप काढण्यात आला. आंतरवली गाव असेल किंवा एकेकाळी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कुमक करणारे नेते, सर्वांनाच आता मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे 'ओझे जड झाले आहे का ?' असेच चित्र निर्माण झाले आहे.
मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन राज्याला नवीन नाही. तसेच त्यांच्या आंदोलनाचे निश्चित असे ठिकाण देखील नव्हते. पूर्वी साष्टी पिंपळगावात त्यांनी दीर्घकाळ उपोषण केले होतेच, नंतर त्यांनी आंदोलनासाठी आंतरवली सराटी हे गाव निवडले. या गावाने मनोज जरांगे यांचे स्वागत तर केलेच पण या आंदोलनात सक्रिय सहभाग देखील नोंदविला. आंदोलन ज्यावेळी मोठे व्हायला लागते, त्यावेळी त्यासाठी त्याग देखील करावा लागतो. आंदोलसाठी 'येऊन जाणाऱ्या' आंदोलक समर्थकांना त्या त्यागाच्या झळा फारशा बसत नसतात. त्या झळा मागच्या तीन वर्षात आंतरवलीकरांनी सहन केल्या. अनेकदा उभी पिके उपटून टाकावी लागली, गावात रहदारी वाढली, कधी त्यांच्या जेवणाची सोय तर कधी आणखी काही असे सारे काही आंतरवलीकरांनी अगदी मनमर्जीने आणि तितक्याच उत्साहाने केले. पण शेवटी हा उत्साह टिकवायचा किती दिवस ? याला काही मर्यादा असतात याची जाणीव आंदोलकांनी देखील ठेवणे अपेक्षित असते. मुळात मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून राज्यातील समाजाला काय मिळाले, काय मिळाले नाही, हे आंदोलन यशस्वी झाले, फसले याबद्दल प्रत्येकाची मते वेगवेगळी आहेत, असू शकतात. मात्र जेथे सुमारे तीन वर्ष आंदोलन चालले, त्या गावाला या आंदोलनातून काय मिळाले याचा विचार कधीतरी गावकरी करणारच, तो त्यांनी आता केला. आपण १० महिन्यापूर्वी अर्ज करून देखील आपल्याला हैद्राबाद गॅझेट प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाही हे आंतरवली मधील महिला म्हणत असतील तर गावाला आंदोलनाचा फायदा काय याचा विचार होणारच.
जसे गावाचे, तसेच नेत्यांचे. मनोज जरांगे यांचे आंदोलन समाजाच्या लेकरांसाठी आहे आणि मला राजकारणाचे देणे घेणे नाही असे मनोज जरांगे यांनी कितीही सांगितले तरी त्यांच्या आंदोलनाचे राजकीय पडसाद, परिणाम झाले हे नाकारता येणार नाही. मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागण्यांबद्दल कोणाचे दुमत नाही, मात्र त्यांच्या राजकीय भूमिका सतत बदलत गेल्या हे देखील तितकेच कटू असणारे वास्तव. आज एखाद्याच्या ओव्या गाणारे मनोज जरांगे उद्या त्याला शिव्या देतात हे महाराष्ट्राने अनुभवले. मागच्या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांचे कोठे तटस्थ राहणे, कोठे त्यांच्या नावाने निरोप फिरणे यामुळे मराठा समाजातीलच अनेकांच्या राजकारणाला धक्का बसला. ज्या नेत्यांनी आपल्याकडे यावे यासाठी गावागावातील तरुण नेत्याची वाट पाहायचा, त्याच नेत्यांना, ज्यांनी राजकारण समाजकारणात हयात घालवली त्यांना देखील समाजाने आंदोलन स्थळी हजेरी लावायला भाग पाडले. बरे नाही जावे तर 'बाजार उठविणार' 'पाडणार' असे इशारे होतेच, त्यामुळे हे आंदोलन सर्वच मराठा नेत्यांना मनातून रुचले होते असे म्हणणे भाबडेपणाचे ठरेल. त्याचे ओझे त्यांना कधी ना कधी वाटणारच.
गाव असेल किंवा नेते, त्यांना या आंदोलनाचे जू उतरविण्यासाठी प्रतीक्षा होती ते वेळेची. आता मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील सहकारी आणि निकटवर्तीयांभोवती आरोपांचे काळे ढग दाटले आहेत.काहींच्या चौकशा होणार असल्याचे सांगितले जाते. आंदोलनाच्या निकट वर्तुळात असणाऱ्या लोकांच्या वाढलेल्या मालमत्तांबद्दल ऐकून नाही म्हटले तरी 'यातून मला काय मिळाले' याचा विचार करणारा वर्ग आहेच,आणि त्यातच आता मनोज जरांगेंनीच 'आंतरवलीतले शेवटचे आंदोलन' असे सांगितल्याचा गावकऱ्यांनी पकडलेला शब्द असेल किंवा एकनाथ शिंदेंवर जरांगे टीका करू लागताच शिवसेनेच्या नेत्यांनी त्याचा 'ऐरे गैरे' असा घेतलेला समाचार, मनोज जरांगे यांच्या टीकेला तितक्याच आक्रमकपणे उत्तर देण्याची नेत्यांनी घेतलेली भूमिका हे अनेकांना आंदोलनाचे ओझे जड झाले आहे हे सांगणारीच होती. आणि हे ओझे एकदाचे उतरवून टाकण्यासाठी आता सारे आपापल्यापरीने बोलते झाले आहेत हे देखील तितकेच खरे.

