बीड दि.२३ (प्रतिनिधी):राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्री आणि आमदारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्ष्काळी परिस्थितीची पाहणी करावी अशा सूचना दिल्या असून त्यांनी स्वतः धाराशिव, लातूर जिल्ह्यात पाहणी केली आहे. मराठवाड्यात दुष्काळाची सर्वाधिक दाहकता बीड जिल्ह्यात आहे, या जिल्ह्याचे पालकत्व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे, आता त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाची दाहकता केव्हा पाहणार असा प्रश्न बीडकरांना पडला आहे.
मराठवाडा विभागात सर्वाधिक पावसाची तूट बीड जिल्ह्यात पाहायला मिळालेली आहे. जिल्ह्यात सरासरीच्या ५५ % इतकाच पाऊस झालेला आहे, त्यातच जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसात मोठ्या प्रमाणावर खंड पडल्याने खरिपाचे पीक हातचे गेलेआहे. आजघडीला जिल्ह्यातील ३० प्रकल्प कोरडेठाक असून तब्बल ७६ प्रकल्पांचे पाणी जोत्याच्या खाली म्हणजे मृत साठ्यात आहे. ज्या नद्या या काळात वाहत राहायच्या त्या आज कोरड्या ठाक असून शेतातून केवळ धूळ उडत आहे. आजघडीला जिल्ह्यात १२० टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे, तर मोठ्या शहरांमध्ये पाणी टंचाई तीव्र व्हायला सुरुवात झाली आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बुधवारी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात येऊन गेले. त्यांनी सर्व मंत्री आणि आमदारांना देखील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी थेट बांधावर जाण्याच्या सूचना केल्या आहेत. अशावेळी बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी असलेल्या सुनेत्रा पवार प्रत्यक्ष पाहणीसाठी बीड जिल्ह्यात येणार आहेत का ? त्या केव्हा येणार असा प्रश्न सामान्य बीडकरांना पडलेला आहे.

