धाराशिव, दि. २३ : धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून, खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेला आहे. अनेक भागांत सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला असून, सोयाबीनसह खरीप पिके करपली आहेत. उसाची वाढ खुंटली असून, तलाव, विहिरी आणि जलस्रोत कोरडे पडत आहेत. त्यामुळे आगामी काळात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि रब्बी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता हा गंभीर प्रश्न बनला आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा आणि मलकापूर येथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. करजखेडा येथील शंभर टक्के कोरड्या पडलेल्या मसाई तलावाची तसेच शेतातील करपलेल्या पिकांची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबत शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल आणि शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले. पंचनामे करणे ही कायदेशीर प्रक्रिया असली तरी दुष्काळाची परिस्थिती मोठ्या क्षेत्रात सरसकट असल्याने केवळ पंचनाम्यांच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना अडकवून ठेवले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
पाणीसाठा पिण्यासाठी राखणार
सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा पिकांना देण्यापेक्षा पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्याची वेळ आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. कारण अनेक भागांत पिके वाचण्याची शक्यता अत्यल्प आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आणि आगामी रब्बी हंगामासाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत त्यांच्या खात्यात जमा करण्याबरोबरच अन्नधान्य आणि अन्य आवश्यक वस्तूंची कमतरता भासू नये, यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीची प्रक्रिया सुरूच राहणार असून, वीजबिलाच्या सवलतीसह पीकविम्याची रक्कम मिळवून देण्यासाठीही शासन प्रयत्नशील राहील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्यावेळी धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार बसवराज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना अडविल्याचा कैलास पाटील यांचा आरोप
दरम्यान, मलकापूर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी गेलेले आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडू दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला,दोरखंड लावून रोखण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. यावरून कैलास पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत हे सरकार भेकड असल्याचे सांगितले
“शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याला मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडण्याची संधी मिळाली पाहिजे,” अशी भूमिका घेत कैलास पाटील यांनी सरकारच्या दौऱ्यावर टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊन मदत करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, मलकापूर येथे संतप्त शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला; मात्र शेतकऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
खरीप गेला; आता रब्बीचीही चिंता
धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर खरीप पिकांच्या नुकसानीबरोबरच आता रब्बी हंगामाचा प्रश्न उभा राहिला आहे. उपलब्ध पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने पिण्याचे पाणी, चारा आणि रब्बी पेरणीसाठी पाणी यांचे नियोजन सरकारला तातडीने करावे लागणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत जीआर काढण्याचे दिलेले आश्वासन आणि सरसकट मदतीची भूमिका यामुळे आता शासनाच्या निर्णयाकडे धाराशिव व लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

