Advertisement

२५ वर्षात १० हजार गुन्हे , अवघ्या साडेतीनशे प्रकरणात शिक्षा      

प्रजापत्र | Monday, 15/02/2021
बातमी शेअर करा

   बीड-अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी अधिक कडक करण्यापासून ते या कायद्याचा गैरवापर होत असल्याचे आक्षेप असतानाच अट्रॉसिटीच्या अंमलबजावणीतील मराठवाड्यातील भेसूर वास्तव समोर आले आहे. १९९५ ते २०२० या २५ वर्षाच्या काळात मराठवाड्यात अट्रॉसिटी कायद्याखाली तब्बल १० हजार ६८४ गुन्हे घडले, मात्र यातील अवघ्या ३५० प्रकरणातच आतापर्यंत दोषींना शिक्षा झाली असून तब्बल ५५९३ प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याचे चित्र आहे.
         मराठवाड्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा नेहमीच वादाचा विषय ठरलेला आहे. या कायद्याचे समर्थन आणि कायद्याला विरोध या दोन्ही बाजू मराठवाड्यात सातत्याने चर्चिल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील इतर विभागाच्या तुलनेत मराठवाड्यात या कायद्याखाली दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण देखील अधिक आहे. तर दुसरीकडे या कायद्याचा राजकीय वापर होतो अशा तक्रारी देखील आहेतच.
चर्चा काहीही असल्या तरी या कायद्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे चित्र मात्र भेसूर आहे. मागील २५ वर्षाचा आढावा घेतला तर अट्रॉसिटी कायद्याखाली दाखल प्रकरणात शिक्षा होण्याचे प्रमाण ४ % देखील नाही. यापूर्वी अनेकदा शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासंदर्भाने चर्चा झाल्या मात्र तसे होताना दिसत नाही. मागच्या २५ वर्षात मराठवाड्यात या कायद्याखाली १० हजार ६८४ गुन्ह्यांची नोंद झाली, मात्र शिक्षा झाली ती अवघ्या साडेतीनशे प्रकरणात. तब्बल ५५९३ प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली. तर अजूनही २८३५ प्रकरणे न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत.

 
दीड हजार प्रकरणे पोलिसांनीच निकाली काढली
एकीकडे या कायद्यातील तरतुदी अधिक कठोर केल्या जात असतानाच पोलीस ठाण्याच्या स्तरावर प्रकरणे निकाली निघण्याचे प्रमाण देखील मराठवाड्यात मोठे आहे. मागच्या २५ वर्षात दाखल झालेल्या १० हजार प्रकरणांपैकी तब्बल १५५७ म्हणजेच सुमारे १५ % प्रकरणे पोलीस ठाण्याच्या पातळीवरच निकाली निघाली आहेत. म्हणजे इतक्या प्रकरणात पोलिसांना दोषारोप दाखल करण्याइतपत देखील पुरावे उपलब्ध आले नाहीत. पोलिसी भाषेत हे गुन्हे 'टेक्निकल ' ठरले आहेत.

 
२५ वर्षात जिल्हा निहाय दाखल गुन्हे
जिल्हा            गुन्हे
औरंगाबाद       १२६२
जालना           १२९३
बीड                १५५४
परभणी           १७४८
लातूर              १२४३
उस्मानाबाद      ९९८
नांदेड              १७५१
हिंगोली              ८३५

६ महिन्यात ४६९ गुन्हे , बीडमध्ये सर्वाधिक ८९
देशात कोरोनासारखी गंभीर परिस्थिती असतानाही या कायद्याखालील गुन्ह्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. जुलै ते डिसेंबर या ६ महिन्यात मराठवाड्यात अट्रॉसिटीखाली दाखल गुन्ह्यांची संख्या तब्बल ४६९ इतकी असून यातील सर्वाधिक ८९ गुन्हे बीड जिल्ह्यात दाखल आहेत . त्याखालोखाल परभणी जिल्ह्यात ७९ गुन्हे दाखल आहेत.तर लातूर(४५ ) आणि उस्मानाबाद (४० ) गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे या गुन्ह्यांमध्ये खून आणि बलात्काराचे प्रमाण लक्षणीय आहे. बीड जिल्ह्यात ६ महिन्यात या कायद्यसोबत दाखल खून ३ तर बलात्कार ६ आहेत , तर लातूर जिल्ह्यात (३ खून ,८ बलात्कार ) आणि उस्मानाबाद (२ खून , ७ बलात्कार ) अशी परिस्थिती आहे.

 

Advertisement

Advertisement