बीड दि.२१ (प्रतिनिधी)-राज्य शासनाचे धोरण आणि जिल्हाधिकारी व एसपींचे संयुक्त पत्र असतानाही वाळू तस्करीच्या कारवायांची महसूल विभागाला माहिती न देण्याच्या तोडपणीच्या 'प्रसाद' प्रकरणाचे वृत्त 'प्रजापत्र' ने दिल्यानंतर आता महसूल विभाग देखील कामाला लागला आहे.बीड तालुक्यातील ठाणे प्रमुखांना महसूल विभागाने पत्र दिले असून यात वाळू तस्करीच्या कारवाया आणि सध्या किती वाहने उभी आहेत ? याची माहिती मागविली आहे.तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी ही माहिती दिली.
वाळू तस्करीच्या प्रकरणात फौजदारी आणि महसूल विभागाची दंडात्मक कारवाई होणे आवश्यक असल्याची ठोस भूमिका बीडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी घेतली आहे.मात्र असे असतानाही ग्रामीण पोलीस ठाण्यात पकडण्यात आलेल्या काही वाळू तस्करी वाहनांची माहिती महसूल विभागाला कळविण्यात आली नसल्याचे प्रकरण 'प्रजापत्र' ने समोर आणले होते. यात तोडपणीचा 'प्रसाद' घेऊन वाहनांची 'बोळवण' झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर आता महसूल विभाग सक्रिय झाला आहे.
सोमवारी या प्रकरणात बीडच्या तहसील कार्यालयामधून ठाणेप्रमुखांना पत्र देण्यात आले असून त्यात पोलिसांनी वाळू तस्करीच्या केलेल्या कारवाया आणि अध्या उभी असलेली वाहने याची माहिती देण्याचे कळविले आहे.वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल आणि पोलिसांनी एकत्रित काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचे आहेत,आम्ही यापूर्वी देखील पोलीस ठाण्यांना तसे पत्र दिले होते,आता पुन्हा सध्या वाळू तस्करीत पकडलेली काही वाहने उभी आहेत का ? याची माहिती मागविली असल्याचे बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी 'प्रजापत्र' ला सांगितले.
वाळू तस्करीच्या बाबतीत आता महसूल आणि पोलीस विभागातील वरिष्ठानींच कठोर भूमिका घेतल्याने वाळू तस्करांना देखील मोठा दणका बसण्याचे संकेत मिळत आहेत.
पोलीस अधीक्षकांच्या कारवाईकडे लक्ष्य
ग्रामीण पोलीस ठाण्यात वाळू तस्करीचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्याची माहिती महसूल विभागाला देण्यात आली नव्हती अशी माहिती आहे.या प्रकरणात आपण स्वतः लक्ष्य घालून चौकशी करून कारवाई करू असे पोलीस अधीक्षकांनी म्हटले होते,त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे देखील जिल्ह्याचे लक्ष्य आहे.

