Advertisement

संपादकीय अग्रलेख- हे लवकर घडले असते तर 

प्रजापत्र | Friday, 18/09/2026
बातमी शेअर करा

कोणत्याही आंदोलनामध्ये अंतिम यशापयशापेक्षा देखील ज्याच्यावर कोट्यवधींच्या संख्येने असलेल्या समाजाने विश्वास टाकला आहे, अशा आंदोलकांचा जीव महत्वाचा असतो. तो विश्वास कमावलेली व्यक्ती जगली तर अशी अनेक आंदोलने उभी करता येतात, त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचे आंदोलन स्थगित झाले हे बरेच झाले. तुटेपर्यंत ताणायचे नसते हे याच आंदोलनाच्या बाबतीत 'प्रजापत्र' ने यापूर्वीही स्पष्ट केले होते. मात्र तरीही मागच्या १० दिवसांपेक्षा अधिक काळ दोन्ही बाजूंनी आंदोलन 'ओढले' गेले. यात समाज, शासन आणि सर्वच संसाधनांची ऊर्जा खर्ची पडली. अखेर अटीतटीचा प्रसंग आल्यावर दोन्ही बाजूनी जी भूमिका घेतली गेली, ती अगोदरच घेतली गेली असती तर अधिक बरे झाले असते.
 
ज्यावेळी चळवळी, आंदोलने क्षीण झाली आहेत असा सूर लावला जातो, आंदोलक आणि आंदोलनांची विश्वासार्हता संपत चालली आहे असे सर्रास बोलले जाते त्या काळात मनोज जरांगे नावाचा व्यक्ती दीर्घकाळ एकाच मुद्द्याभोवती आंदोलन उभारतो, फिरवतो आणि त्या आंदोलनाची निकड, शक्ती, ऊर्जा आणि त्या आंदोलनाभोवती असलेला समाज शक्तीचा रेटा टिकवून ठेवतो हे सारेच आश्चर्य वाटावे असेच आणि मनोज जरांगेंवर समाजाच्या असलेल्या विश्वासाचे प्रतीक देखील. मनोज जरांगे यांच्याबद्दल मराठा समाजातील सामान्यांना असलेला विश्वास आणि जरांगे यांची समाजावर असलेली संमोहन शक्ती याचे कौतुक करावेच लागते. त्यामुळेच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची दखल आतापर्यंत प्रत्येकवेळी सरकारला घ्यावी लागली आणि जरांगेंसमोर सरकार गुडघ्यावर येते हाच संदेश राज्यात यापूर्वी गेलेला.जरांगे यांचे यावेळचे आंदोलन देखील असेच असेल असे सुरुवातीला वाटले होते, मात्र यावेळच्या आंदोलनाच्या बाबतीत सरकारची भूमिका काहीशी वेगळीच होती. त्याची तितकीशी कल्पना आंदोलकांना आली नाही असेच म्हणावे लागेल. कोणतेही मोठे आंदोलन ज्यावेळी उभारले जाते, त्यावेळी आंदोलकाला मोठी चढाई करतानाच आवश्यकता पडल्यास माघारीची तयारी देखील करून ठेवावी लागते. याबाबतीत मनोज जरांगे तसे चाणाक्ष, त्यांच्याच शब्दात सांगायचे तर 'नमुना' माणूस. मात्र तरीही काही प्रसंग असे काही घडत गेले की आंदोलन त्यांना हवे तसेच चालेल अशी परिस्थिती राहिली नाही. मनोज जरांगे यांची समाजाप्रती असलेली तळमळ आणि समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठीचा अट्टाहास समजण्यासारखा असला तरी त्यांची राजकारण्यांबद्दल 'कधी ओव्या तर कधी शिव्या' ही भूमिका यावेळी आंदोलनाच्या अडचणी वाढविणारी ठरली. खरेतर आज मनोज जरांगे यांनी ज्या शब्दांवर उपोषण मागे घेतले, तेच शब्द आंतरवलीत आलेल्या शिष्टमंडळाने दिले होतेच, मात्र त्यावेळी मनोज जरांगे हटून बसले आणि मग सरकारी शिष्टमंडळाने देखील 'आता चर्चा नाही, देता होत होते तितके दिले, आता बस्स' अशी भूमिका घेतली. त्यातूनच मग पुढच्या १० दिवसांची अस्वस्थता वाढत गेली. अगदी मनोज जरांगे यांच्या जीवावर बेतते का काय असे वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली होतीच, असे होणे कोणत्याही आंदोलनाच्या दृष्टीने निश्चितच योग्य नाही.
आंदोलनाच्या विश्वसार्हतेबद्दल भाष्य करण्याचे काही कारण नाही, कारण सरकारने कितीदाही फसविले, आंदोलनातून काही मिळाले किंवा नाही मिळाले, कधी गुलाल उधळून नंतर शिमगा करण्याची वेळ आली तरी मराठा समाजातील एका वर्गाने मनोज जरांगेंना आपला 'नायक' मानले आहे त्यात फारसा फरक पडलेला नाही, मात्र  सरकार आणि आंदोलक दोन्ही बाजूनी जी भूमिका आता घेतली गेली ती १० दिवसांपूर्वी घेतली गेली असती तर अनेक गोष्टी टाळता आल्या असत्या. सरकार आणि आंदोलक, विशेषतः मनोज जरांगे यांच्यात जो शाब्दिक संघर्ष झाला तो टळला असता.ज्या शिवराळ भाषेची चर्चा रोजच घडत गेली, ती देखील झाली नसती, आंदोलनाभोवती 'ईडी' चा जो विषय चर्चेत आला, त्यात तथ्य असेल नसेल, मात्र त्या संशयाची 'इडा पीडा' नक्कीच टाळता आली असती. आम्ही सर्व काही देत असताना जरांगे हट्ट करत आहेत हे सरकारचे सांगणे आणि मराठा समाजातील अनेकांनी तीच मांडणी करणे यातून मराठा समाजातील एकीला तडे जात आहेत हा जो संदेश गेला तो टाळता आला असता आणि मागच्या १० दिवसात जी ऊर्जा खर्च झाली ती पुढच्या सकारात्मकतेसाठी राखून ठेवता आली असती.

Advertisement

Advertisement