Advertisement

धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थितीचा उद्या आढावा

प्रजापत्र | Monday, 07/09/2026
बातमी शेअर करा

धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) : जिल्ह्यात निर्माण झालेली पाणीटंचाई आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार (दि.८) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १०.३० वाजता ही बैठक होणार आहे.

  जिल्ह्यात यंदाच्या पावसाची स्थिती, उपलब्ध पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, खरीप पिकांची परिस्थिती, सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच आगामी काळातील पाणीटंचाईची शक्यता याबाबत बैठकीत सविस्तर आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कृषी विकास अधिकारी, महावितरणचे कार्यकारी अभियंता, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे अधिकारी तसेच बॉम्बे आयआयटीचे प्रतिनिधी आदी उपस्थित राहणार आहेत.पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांनी आवश्यक माहिती व अहवालासह बैठकीस उपस्थित राहावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रतिनिधी न पाठविता स्वतः उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान, जिल्ह्यातील पाणीटंचाईची सद्यस्थिती, उपलब्ध जलस्रोत, संभाव्य टंचाईग्रस्त गावे आणि त्यासाठी करावयाच्या उपाययोजना यावर बैठकीत निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

Advertisement