धाराशिव :पुण्यातील गणेशोत्सवात वाजविण्यात येणाऱ्या डीजेवरून वाद सुरु आहेत. यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. पुण्यातील सजग नागरिक असलेल्या विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवात वाजविण्यात येणाऱ्या डीजेच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यातच दोन दिवसापूर्वी विद्यानंद बापट हे नास्तिक असल्याने त्यांच्या भूमिकेवरुन वाद निर्माण होऊन त्यांना मारहाणही करण्यात आली. या सर्व घटना ताज्या असतानाच धाराशिव जिल्हयातील एका कार्यक्रमप्रसंगी मंत्री मेघना बोर्डीकर यांनी डीजेला थेट विरोध करणारे वक्तव्य केले आहे. गणेशोत्सवातील डीजेबाबत थेट सवाल उपस्थित करीत त्यांनी परखड भूमिका घेतली आहे.
पुणेकर सांस्कृतिक पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतील,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काळात पुण्यातील डीजेबाबत काय निर्णय घेतला जाणार याबाबत उत्सुकता लागली आहे. धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथे आ.बसवराज पाटील यांनी आरोग्य शिबीर आयोजित केले होते. त्या शिबिरासाठी मंत्री मेघना बोर्डीकर धाराशिवमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.यावेळी मेघना बोर्डीकर यांनी डीजेबाबत बोलताना मोठे विधान केले आहे. माझ्या सख्या चुलत भावाचा गेल्यावर्षी गणपतीत डीजेच्या आवाजामुळे मृत्यु झाला. सुप्रीम कोर्टाने डीजे बंदी केल्यानंतर ही आपल्याला ते मान्य नसते. सण-उत्सव साजरे करत असताना आपण काही मर्यादा घालायला हव्यात,असे मत मंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केले.डीजे बंदीवर बोलताना त्यांनी भावाच्या दुर्दैवी मृत्यूची आठवण देखील सांगितली. त्यामुळे, सरकारमधील मंत्री महोदयांनीही डीजे वाजवण्यावरुन आणि ध्वनीप्रदुषणावरुन एकप्रकारे बापट यांची भूमिका योग्यच असल्याचे त्यांनी सूचवले आहे. त्यामुळे आता याबाबत राज्य सरकार कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, योग्यवेळी योग्य निर्णय सीएम फडणवीस घेतील. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मंत्रिमंडळाची समिती चर्चा करत आहे. त्यांच्या मागण्याबाबत योग्य तोडगा निघेल, असा विश्वासही यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना मंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

