Advertisement

छत्रपती संभाजीनगर: व्यावसायिक वादातून मित्राचीच निर्घृण हत्या

प्रजापत्र | Thursday, 22/10/2026
बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर शहरातील एन-७ सिडको भागात एका तरुणाने आपल्याच मित्राचा अत्यंत क्रूरपणे खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यावसायिक ईर्ष्येतून हा प्रकार घडला असून, आरोपीने आधी मित्राला भरधाव कारने उडवले आणि नंतर खाली पडून तडफडत असताना त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने वार करून त्याचा जीव घेतला.

देवेश ऊर्फ बंटी चंद्रेश दीक्षित (३६) असे मृताचे नाव असून, पवन दिलीप पराशर (२२, रा. वानखेडेनगर) असे या मारेकऱ्याचे नाव आहे. या थरारक घटनेनंतर आरोपी पवन याने स्वतः सिडको पोलीस ठाणे गाठून शरणागती पत्करली.

मृत बंटी दीक्षित आणि पवन पराशर यांच्यात गेल्या काही काळापासून पैशांवरून आणि व्यवसायावरून धुसफूस सुरू होती. घटनेच्या दिवशी बंटी जिमहून दुचाकीने घरी परतत असताना पवन कारमधून त्याच्यावर पाळत ठेवून होता. एन-७ येथील मंगेश गॅस एजन्सीजवळ बंटी पोहोचताच, पवनने मागून आपल्या कारची धडक दिली. या भीषण धडकेत बंटी उडून रस्त्यावर पडला, तर त्याची दुचाकी १५० फूट अंतरावर फरफटत गेली.

बंटी रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडला असताना, आरोपीने गाडी पुढे नेऊन अचानक यू-टर्न घेतला. परत बंटीजवळ गाडी थांबवून पवन खाली उतरला आणि त्याने सोबत आणलेल्या लाकडी दांड्या व लोखंडी रॉडने बंटीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. वर्मी घाव लागल्याने बंटीचा जागीच अंत झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, निरीक्षक गजानन कल्याणकर आणि अतुल येरमे यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासाला गती दिली आहे.

Advertisement

Advertisement