गेवराई : शिक्षकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून अवघ्या १३ वर्षांच्या शाळकरी मुलाने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना पाथर्डी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकाविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समर्थ आबासाहेब खरात (वय १३, मूळ रा. कवडगाव, ता. गेवराई) असे मृत बालकाचे नाव आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील 'हिंद वसतिगृहात' राहून समर्थ सातवीत, तर त्याचा लहान भाऊ साई पाचवीच्या वर्गात शिकत होता. वसतिगृहातील शिक्षक सुभाष घुगे हे मागील काही दिवसांपासून समर्थला सातत्याने अकारण त्रास देत होते. समर्थने या जाचाबाबत वडिलांकडे बोलूनही दाखवले होते. अखेर या मानसिक त्रासाला कंटाळून समर्थने बुधवारी (२१ ऑक्टोबर) दुपारी वसतिगृहाच्या खोलीतच गळफास लावून टोकाचे पाऊल उचलले.
घटनेची माहिती मिळताच संतप्त नातेवाईकांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात धाव घेत ठिय्या आंदोलन केले व तात्काळ गुन्हा नोंदवण्याची मागणी लावून धरली. स्थानिक पातळीवर निष्पक्ष तपासणीबाबत साशंकता व्यक्त करत नातेवाईकांनी पाथर्डीत शवविच्छेदन करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आला असून, दुसऱ्या दिवशीही शवविच्छेदन प्रलंबित होते.
या दुर्दैवी घटनेमुळे निवासी वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल व निःपक्ष चौकशी करून जबाबदार शिक्षकावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी तीव्र मागणी परिसरातून केली जात आहे.

