Advertisement

संपादकीय अग्रलेख - भरकटू नये आंदोलन

प्रजापत्र | Monday, 31/08/2026
बातमी शेअर करा

 

 दिवंगत अण्णासाहेब पाटील यांनी केलेले आत्मबलिदान , त्यानंतर अनेकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केला संघर्ष, लाखोंच्या संख्येने निघालेले मोर्चे, दिवंगत विनायक मेटे यांच्यापासून ते अनेकांच्यापर्यंतचे योगदान या सर्वांपेक्षाही मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे आपल्या समाजाचे भले होत आहे हा समज आज गावखेड्यातल्या विस्थापित आणि वेगवेगळ्या कारणांनी रोजच्या जगण्यासाठीचा संघर्ष पदरी आलेल्या मराठा तरुणाईचा झालेला असणे हे मनोज जरांगे यांच्या संघटन कौशल्याचे मोठे यश. त्यामुळेच मनोज जरांगे जेव्हा जेव्हा आंदोलनाची हाक देतात,त्या त्यावेळी सरकारकडून मागच्या वेळी झालेली फसवणूक  आणि त्या त्या वेळी मनोज जरांगे यांनी घेतलेल्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून मराठा समाजातील एक विशीष्ट वर्ग जरांगेच्या आंदोलनाला बळ देतो हे वास्तव आहे. म्हणूनच मग अशावेळी हे आंदोलन आपल्या मागण्यांसाठी व्हावे का कोणी कोणाचे कार्यक्रम घ्यायचे का नाही हे ठरविण्यासाठी आंदोलनाची शक्ती खर्ची  पडावी याचा विचार मनोज जरांगे यांनीच करायला हवा.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी शनिवारपासून आंतरवलीमध्ये उपोषण सुरु केले आहे. एखाद्या मुद्द्याचा सातत्याने पाठपुरावा करणे आणि तो विषय तडीस लावण्यासाठी टोकाचा संघर्ष करण्याची मनोज जरांगे यांची जिद्द निश्चितच वाखण्याजोगी आहे. आजकालच्या राजकीय, सामाजिक वातावरणात मुद्दे, तत्व , निष्ठा या साऱ्याच गोष्टी कमालीच्या अस्थिर झालेल्या असताना मनोज जरांगेंसारखा सामान्य माणूस राज्यात एव्हढे मोठे आंदोलन उभारतो आणि त्याच्या मागे समाजाचे बळ मिळते हे देखील मोठे आश्चर्य.आज मराठा आरक्षणासाठी आत्मबलिदान देणारे अण्णासाहेब  पाटील असतील, मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा दीर्घकाळ चालविणारे दिवंगत विनायक मेटे असतील किंवा मराठा समाजाचे आणखी कोणतेही राजकीय नेतृत्व, या सर्वांपेक्षा मराठा समाजातील तरुणाईला मनोज जरांगे अधिक जवळचे वाटतात आणि मग त्यासाठी मनोज जरांगे यांचे कसलेही बोलणे देखील त्या तरुणाईला अपक्षेपार्ह वाटत नाही. मनोज जरांगे आणि समाजाची  सरकारने अनेकदा फसगत केली आहे हे कळत असतानाही समाजातील तरुणाई पुन्हा मनोज जरांगे यांच्या मागे उभा राहते हे मनोज जरांगे यांचे यशच. आजपर्यंत याच तरुणाईच्या जोरावर मनोज जरांगे यांनी सरकारला नाक मुठीत धरायला भाग पडले. सरकारने आपण जरांगेंना शरण येत आहोत हे दाखवून प्रत्यक्षात मात्र समाजाच्या पदरात खरोखर काय पडले याचा विचार करायला मराठा समाजालाच भाग पाडले हा भाग वेगळा.तर तेच मनोज जरांगे आता पुन्हा आंदोलन करत आहेत. वेगवेगळ्या गॅझेटची अंमलबजावणी, जेव्हढ्या नोंदी सापडल्या तेव्हढी प्रमाणपत्रे द्या  या जुन्या मागण्यांसोबतच आता जात पडताळणी समित्याच रद्द करा अशी आणखी एक मागणी जरांगे यांनी केली आहे. या मागण्या चूक का बरोबर याची चर्चा सध्या करण्याचे काहीच कारण नाही, कारण भावनिकतेवर उभ्या राहिलेल्या आंदोलनात कोणी योग्य अयोग्यच फारसा विचार करत नाही आणि तसे काही ऐकून घेण्याची कोणाची मानसिकता देखील नाही. आता अशा समित्या खरोखर रद्द करणे शक्य आहे का आणि 'सरसकट' प्रमाणपत्रे देता येतील का याचा विचार जरांगे यांच्याकडे वारंवार शिष्टमंडळे पाठविणाऱ्या आणि आपल्याच मंत्र्यांना दिल्या जाणाऱ्या शिव्या गुमान ऐकणाऱ्या सरकारने करायचा आहे.पण हे सारे होत असताना एक घटना घडली , ती टाळता आली असती का ? याचा विचार मनोज जरांगे यांनी करावा अशी अपेक्षा आहे. मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु झाले शनिवारी आणि रविवारी परभणीत खा.संजय जाधव यांनी मोठा मेळावा ठेवला होता, त्याला उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. आता दोन महिन्यांपूर्वी ठरलेला कार्यक्रम खा.जाधव यांनी रद्द करावा असे मनोज जरांगे यांना वाटले. ते त्यांना का वाटावे याबद्दलही काही भाष्य करण्यात अर्थ नाही. आपला समाज आंदोलन करत असताना असले कार्यक्रम कशाला असे त्यांना वाटू शकते इथपर्यंतही ठीक. मात्र त्यांनी लगेच खा.जाधव यांना सर्वांसमोर फोन करायचा , तो व्हिडीओ व्हायरल होईल असे पाहायचे , त्यानंतर मीच परभणीला येतो असेही सांगायचे हा दबाव आणि त्याचे जाहीर प्रदर्शन खरोखर आवश्यक होते का ? त्याचा आरक्षण आंदोलनाशी खरोखर संबंध आहे का ? बरे हे सारे केल्यानंतरही 'मी कार्यक्रम रद्द करू शकत नाही ' अशी खा. जाधव यांनी घेतलेली भूमिका आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती यामुळे मग 'जरांगे  यांचे आदेश डावलून ' हा जो प्रचार झाला त्याचे काय ?
मुळात मनोज जरांगे हे सुरुवातीपासून मी माझ्या लेकरांसाठी झगडतोय, राजकारण गेलं चुलीत असे म्हणायचे, मग आता 'मामा , मी तुला मामा केला ' 'मी संजय जाधव साठी काय काय नाही केलं ? ' ' शिंदेसाहेब , तुमच्यावरचा  गद्दार हा शिक्का पुसण्यासाठी आम्ही किती मेहनत घेतली ? ' अशी त्यांची मागच्या काही काळातली वाक्य पाहिली आणि आता पूर्वीच्या गावबंदीप्रमाणेच 'कार्यकर्मबंदी'चे आदेश मनोज जरांगे काढणार असतील आणि ते पाळले जाणार नसतील (उद्या भलेही खा. जाधव आंतरवलीत जाऊन जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होतील ) तर आंदोलनाची, समाजाची शक्ती मूळ प्रश्नापेक्षा भलतीकडेच खर्च होत नाही ना आणि आपले आंदोलन भरकटत नाही ना? याचा विचार आवश्यक वाटल्यास मनोज जरांगेंनी करावा , त्यांचे समर्थक तो करणार नाहीत , अभ्यासकांनी काही सांगितले तर ते जरांगेंना पटणार नाही, पण एकदा इतक्या मोठ्या समाजाने,मोठ्या मनाने दिलेल्या नेतृत्वाच्या जबाबदारीच्या जाणिवेतून तरी मनोज जरांगे यांच्याकडून यावर विचार व्हावा.

Advertisement

Advertisement