धाराशिव दि.१५(प्रतिनिधी): वाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पारगावनजीक सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पृथ्वीराज बार अँड लॉजवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने छापा टाकून परराज्यातील आठ महिलांची सुटका केली. वेश्याव्यवसाय चालविल्याच्या संशयावरून लॉज मालक घुले आणि व्यवस्थापक शेट्टी या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पारगाव येथील संबंधित लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलिस निरीक्षक मारुती शेळके यांनी पथकासह कारवाईचे नियोजन केले.
परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक माधुरी मारकड, पोलिस उपनिरीक्षक सोनटक्के, महिला पोलिस अंमलदार पुरी, जाधव व दूधभाते, पोलिस नाईक माने, चालक तसेच डमी ग्राहकाच्या मदतीने पथकाने रात्री साडेआठच्या सुमारास लॉजवर छापा टाकला. या वेळी वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या परराज्यातील आठ महिला आढळून आल्या. त्यांची पोलिसांनी सुटका केली.
प्राथमिक तपासात लॉज मालक घुले आणि व्यवस्थापक शेट्टी हे एजंटच्या माध्यमातून महिलांना लॉजमध्ये आणत असल्याचे तसेच पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या माध्यमातून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.संबंधित लॉजमध्ये प्रामुख्याने बीड जिल्ह्यातून ग्राहक येत असल्याची माहितीही तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले.
पोलिस उपनिरीक्षक सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील (BNS) संबंधित कलमांनुसार दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या आठ महिलांबाबत पुढील कार्यवाही सुरू असून, या प्रकरणाचा तपास वाशी पोलिस करीत आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
जिल्ह्यात कुठेही चोरीछुप्या पद्धतीने वेश्याव्यवसाय, मानवी तस्करी अथवा महिलांचे शोषण होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी ती तातडीने पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी. माहिती देणाऱ्यांनी पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी केले आहे.

