मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १२ ऑगस्टपर्यंत राज्यात तब्बल १ कोटी १ लाख ७३ हजार ८३८ प्रवाशांनी या स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी ६४ लाख ९१ हजार ६५ कार्डे सक्रिय झाली आहेत.
एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एसटी प्रवासातील तिकीट व्यवहार अधिक सुलभ आणि कॅशलेस करण्याच्या दिशेने महामंडळाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना या स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात येत आहे. येत्या १ सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
प्रवाशांचा डिजिटल परिवर्तनावरील विश्वास
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी ही केवळ प्रवासाची सेवा नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाशी जोडलेली लोकवाहिनी आहे. या ‘लालपरी’चा प्रवास काळानुरूप अधिक आधुनिक, डिजिटल आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एनसीएमसी स्मार्ट कार्डला मिळणारा प्रतिसाद हा प्रवाशांचा या डिजिटल परिवर्तनावरील विश्वास दर्शवितो. भविष्यात एसटीच्या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रवाशांचा वेळ वाचविणे आणि त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
१५ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना एनसीएमसी कार्डचे वाटप
येत्या १५ ऑगस्टपासून राज्यभरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत जाऊन एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एनसीएमसी कार्डसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. प्रवाशांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अधिकृत एसटी आगार, बसस्थानक तसेच अधिकृत एजंट नेटवर्कच्या माध्यमातून मिळविता येणार असून, त्याच माध्यमातून कार्ड रिचार्जची सुविधाही उपलब्ध आहे.दरम्यान, प्रवाशांचा विश्वास हीच एसटीची खरी ताकद आहे. डिजिटल सुविधांचा स्वीकार करून प्रवाशांनी एसटीच्या आधुनिकतेच्या प्रवासाला दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. येत्या काळात एनसीएमसी स्मार्ट कार्डचा वापर आणखी व्यापक करून ‘प्रवासी प्रथम’ या भूमिकेतून एसटीच्या सेवांना नवे डिजिटल रूप देऊ, असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

