Advertisement

 कळंबमध्ये दोन तरुणांकडून ११.२१ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त

प्रजापत्र | Tuesday, 04/08/2026
बातमी शेअर करा

धाराशिव दि.४(प्रतिनिधी): जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तरुण पिढीला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या ‘एमडी’ (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थाच्या विक्रीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. कळंब शहरालगत पाझर तलावाजवळ बेकायदेशीररित्या ‘एमडी’ ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या निखिल जाधव,अरविंद कांबळे या दोघांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले.त्यांच्याकडून तब्बल ११.२१ ग्रॅम वजनाचा पांढऱ्या रंगाचा स्फटिक स्वरूपातील अमली पदार्थ (२९ पारदर्शक प्लास्टिक पुड्या) जप्त करण्यात आला आहे.

   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये एमडी ड्रग्जची विक्री होत असल्याची व त्यामुळे तरुण पिढी नशेच्या खाईत ढकलली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळत होती. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती काढून तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते.त्यानुसार ३ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी विनोद इज्जपवार हे सहकाऱ्यांसह कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान,कळंब-येरमाळा रस्त्यावर कळंब शहरालगत असलेल्या पाझर तलावाजवळ दोन व्यक्ती बेकायदेशीर एमडी ड्रग्ज घेऊन येणार असल्याची पक्की माहिती खबऱ्याकडून मिळाली.या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२६/२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क) आणि २२(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कौतुकास्पद असली, तरी केवळ किरकोळ विक्रेत्यांना पकडून भागणार नाही, तर या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण? हे शोधून ही साखळी काढण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.सदरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि खटके,सपोनि मगर (पो.स्टे. कळंब), पोहेकॉ/३९७ राठोड, पोहेकॉ/३२७ जानराव, पोहेकॉ/१४३१ गादेकर, पोहेकॉ/१४७९ जाधवर, पोहेकॉ/५८४ चौरे, पोना/१६११ जाधवर, पोना/१६३१ ढगारे, पोअं/१८९३ मुंगळे, पोहेकॉ/८४ शेख (पोस्टे कळंब), पोहेकॉ/१८३६ माळवे (पोस्टे कळंब), पोअं/५८३ बोईनवाड, पोहेकॉ/१२४८ आरब आणि चापोहेकॉ/१३४४ माने यांच्या पथकाने यशस्वीरीत्या केली.

 

फॉरेन्सिक व्हॅन व पंचांच्या समक्ष अंगझडती
माहितीची खात्री पटताच एनडीपीएस  कायद्यातील तरतुदींचे तंतोतंत पालन करत पोलीस पथक, पंच आणि फॉरेन्सिक व्हॅनसह घटनास्थळी रवाना झाले. रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून उभ्या असलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी आपली नावे निखिल जाधव आणि अरविंद कांबळे अशी सांगितली. पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्यांच्याकडे २९ प्लास्टिकच्या पुड्यांमध्ये ११.२१ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज मिळून आले. 

 

Advertisement

Advertisement