बीड दि. १४ (प्रतिनिधी ) : बीडच्या पोलीस अधीक्षकांनी मागील वर्षी केलेल्या कर्मचारी बदल्यांपैकी काही कर्मचाऱ्यांना ४ आठवड्याच्या त्यांच्या मूळ ठिकाणी पदस्थापना देण्याचे आदेश मॅटने दिले होते,मात्र याला दोन महिने उलटूनही त्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने काही कर्मचाऱ्यांनी मॅटमध्ये अवमान याचिका दाखल केली आहे.त्यानुसार मॅटने पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावली असून यातील पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी होणार आहे. मॅटच्या आदेशाचे अवमान केल्याप्रकरणी पोलीस अधिक्षकांना नोटीस येण्याची मागच्या काही दशकातील बीड जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे.
२०२५ मध्ये बीडच्या पोलीस अधिक्षकांनी केलेल्या कर्मचारी बदल्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. यातील अनेक कर्मचाऱ्यांना स्वग्राम गेली, इतर कारणे दाखवून बदलण्यात आले होते.त्याला या कर्मचाऱ्यांनी मॅटमध्ये आव्हान दिल्यानंतर २०२६ च्या एप्रिल महिन्यात मॅटने या कर्मचाऱ्यांना त्यांच्या बदली पूर्वीच्या मूळ ठिकाणी ४ आठवड्याच्या आत पदस्थापना देण्याचे आदेश बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिले होते. ही चार आठवड्याची मुदत संपल्यानंतरही पोलीस अधीक्षकांनी मॅटच्या आदेशाचे पालन केले नसल्याचे सांगत काही कर्मचाऱ्यांच्या वतीने विधिज्ञ ओमप्रकाश माने यांच्या मार्फत मॅटमध्ये अवमान याचिका दाखल करण्यात आली. त्यानुसार आता मॅटच्या न्या.व्ही.के.जाधव आणि विजय कारगावकर यांच्या पीठाने पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी ठेवली आहे.
या अवमान याचिकेच्या सुनावणी दरम्यान पोलीस अधिक्षकांच्या वतीने मॅटच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करायची का कसे यासंदर्भाने आम्ही विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे, अद्याप त्या विभागाकडून अभिप्राय आलेला नाही अशी भूमिका मांडली गेली, मात्र अद्याप अशी याचिका दाखल झाली नसल्याने पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावण्याचे आदेश मॅटने दिले आहेत.मॅटच्या आदेशाची अवमान झाल्या प्रकरणात पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला नोटीस मिळण्याची बीडच्या इतिहासातील मागच्या काही दशकातील ही पहिलीच वेळ असावी.

प्रजापत्र | Tuesday, 14/07/2026
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
