बीड दि. ११ (प्रतिनिधी): येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात लिफ्ट बंद पडल्यामुळे १८ टाके पडलेल्या जखमी महिलेला नातेवाईकांनी अक्षरशः झोळी करून तिसऱ्या मजल्यावरील वॉर्डात नेण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
माहितीनुसार, उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेला गंभीर दुखापत झाल्याने तिच्यावर टाके घालण्यात आले होते. त्यानंतर तिला संबंधित वॉर्डात हलविण्याची वेळ आली असता रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्याचे समोर आले. त्यामुळे नातेवाईकांनी महिलेला झोळी करून जिन्याने तिसऱ्या मजल्यावर नेले. या संपूर्ण प्रकारामुळे रुग्णाला मोठा त्रास सहन करावा लागला.जिल्हा रुग्णालयात यापूर्वीही लिफ्ट बंद पडण्याच्या घटना घडल्या असून, वारंवार तक्रारी होऊनही कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याचा आरोप होत आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयातच अशी परिस्थिती असेल तर ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांची अवस्था काय असेल, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन रुग्णालय प्रशासनाने लिफ्ट तातडीने कार्यान्वित करावी, तसेच रुग्णांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिक व रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

प्रजापत्र | Saturday, 11/07/2026
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
