नेकनूर दि.१०(वार्ताहर):येथील बसस्थानक परिसरात एकट्या महिलांना विश्वासात घेऊन हातचलाखीने सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन महिला आरोपींना अटक करण्यात नेकनूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा छडा लावत पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत ही कारवाई केली. या आरोपींकडून यापूर्वी घडलेल्या अशाच प्रकारच्या चोरीच्या घटनांचाही उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.६) रोजी नेकनूर बसस्थानक परिसरात एका महिलेच्या पिशवीतील सुमारे ७७ हजार ४०० रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात महिलांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास सुरू असताना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. त्यानंतर सोजर सूरज भोसले (वय ३५, रा. पारनेर, ता. पाटोदा, जि. बीड) व शबाना अरुण काळे (वय २६, रा. पारनेर, ता. पाटोदा, जि. बीड) या दोघींना अटक करण्यात आली.विश्वास संपादन करून करायच्या चोरी प्राथमिक चौकशीत आरोपींची धक्कादायक कार्यपद्धती समोर आली आहे. बसस्थानक किंवा बसमध्ये एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना लक्ष्य करून त्या प्रथम त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधत असत. "गर्दीत गळ्यातील दागिने चोरीला जाऊ शकतात, ते पिशवीत ठेवा," असा सल्ला देऊन महिलांचा विश्वास संपादन केला जात असे. त्यानंतर सोबत असलेल्या लहान मुलाचा आधार घेत अथवा इतर कारण सांगून संभाषण सुरू ठेवले जाई. महिलांचे लक्ष विचलित होताच हातचलाखीने पिशवीतील दागिने चोरून आरोपी गर्दीचा फायदा घेत पसार होत असत.
जुन्या गुन्ह्यांचाही उलगडा होण्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्याचा तपास अद्याप सुरू असून, आरोपींनी बीड जिल्ह्यासह इतर भागांमध्येही अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना केल्या आहेत का, याचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. त्यामुळे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मा. पोलीस अधीक्षक नवनीत कावंत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.
महिलांनी सावध राहावे पोलिसांचे आवाहन
बसस्थानक, रेल्वे स्थानक, बाजारपेठ किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी अनोळखी व्यक्तींच्या सल्ल्यावर विश्वास ठेवून गळ्यातील सोन्याचे दागिने काढून पिशवीत ठेवू नयेत. प्रवासादरम्यान संशयास्पद हालचाल करणाऱ्या किंवा विनाकारण बोलण्यात गुंतविणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहावे. कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नेकनूर पोलिसांनी केले आहे.
या यशस्वी कारवाईत पोलीस हवालदार विशाल क्षीरसागर व पोलीस हवालदार विद्वान कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले असून, त्यांच्या कामगिरीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.

