दिल्ली : पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई केली होती. या मोहिमेदरम्यान देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सहा शूर जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत. या सर्व शहीदांचे नाव आता राष्ट्रीय युद्ध स्मारक (National War Memorial) येथे कायमस्वरूपी कोरले जाणार आहे.
पाच जवान भारतीय लष्कराचे, एक हवाई दलाचा सार्जंट
ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सहा जवानांमध्ये भारतीय लष्कराचे पाच जवान आणि भारतीय हवाई दलाचा एक सार्जंट यांचा समावेश आहे.
शहीद जवानांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
१. सुभेदार मेजर पवन कुमार – मुख्यालय, १० इन्फंट्री ब्रिगेड
२. रायफलमन सुनील कुमार – ४ थी बटालियन जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री रेजिमेंट
३. लान्स नाईक दिनेश कुमार – ५ वी फील्ड रेजिमेंट
४. अग्निवीर मूड मुरली नायक – ८५१ वी लाइट रेजिमेंट
५. हवालदार सुनील कुमार सिंग – २३७ वी फील्ड वर्कशॉप
६. सार्जंट सुरेंद्र कुमार – ३९ विंग, भारतीय हवाई दल
दोन शूरवीरांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार
या सहा शहीदांपैकी दोन जवानांना त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी मरणोत्तर सन्मानही देण्यात आला आहे. रायफलमन सुनील कुमार यांना देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च युद्धकालीन शौर्य पुरस्कार 'वीर चक्र' मरणोत्तर प्रदान करण्यात आला. ते ऑपरेशनदरम्यान नियंत्रण रेषेवर (LoC) तैनात होते.तसेच सार्जंट सुरेंद्र कुमार यांना मरणोत्तर 'वायु पदक' प्रदान करण्यात आले. 8 जून रोजी आयोजित संरक्षण अलंकरण सोहळ्यात (Defence Investiture Ceremony) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कायमची नोंद
राष्ट्रीय युद्ध स्मारकातील 'त्याग चक्र' हे देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आले आहे.या स्मारकात ग्रॅनाइटच्या 16 वर्तुळाकार भिंती असून, त्यावरील प्रत्येक दगडावर स्वातंत्र्यानंतर देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचे नाव, पद आणि युनिट कोरले जाते.
आता ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या या सहाही वीर जवानांची नावेही या गौरवशाली स्मारकावर कायमस्वरूपी कोरली जाणार आहेत.

