बीड-केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरुणाच्या हत्याला तीन दिवस उलटल्यानंतर पोलीस अधिक्षक यांनी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता केज पोलीस ठाणे गाठले आहे. सध्या कॉवत घुले कुटुंबियांशी चर्चा करत असून आज तरी याप्रकरणात तोडगा निघणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विलास घुलेची हत्या केल्यानंतर याप्रकरणातील आरोपीना अटक करण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात आ. धनंजय मुंडे यांनी सभागृहात आवाज उठवला होता. त्यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील पोलीस अधिक्षक यांना फोन करून दोषीना सोडू नका अश्या सुचना केल्या. त्यापाठोपाठ दुपारनंतर सभागृहात आ. नमिता मुंदडा यांनी देखील सभागृहात आक्रमक होऊन कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंती विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे केली होती. दरम्यान वातावरण तापल्यानंतर छत्रपती संभाजीनगरवरून आयजी विरेंद्र मिश्रा बीडमध्ये दाखल झाले होते. त्यांनी पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांना सूचना केल्यानंतर अखेर तिसऱ्या दिवशी कॉवत यांना आंदोलनकर्त्यांशी संवाद साधायला वेळ मिळाला आहे. विशेष म्हणजे कॉवत यांनी आंदोलक यांच्याशी फोनवर चर्चा करताना आपण हैद्राबादला ट्रेनींगला गेलो होतो असा दावा देखील केला होता. मात्र ते बीडमध्ये शनिवारीच दाखल झाले त्यानंतर त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात एक राउंड देखील मारला होता. मात्र चेतना तिडके यांच्याकडून त्यांनी पदभार सोमवारी स्वीकारला. घटनेचे गांभीर्य पाहता कॉवत यांनी तात्काळ धाव घेऊन संवाद साधला असता तर तीन दिवसापूर्वी विलास घुलेवर अंत्यसंस्कार देखील झाले असते. मात्र एसपी यांनी उशिरा धाव घेतल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून आता घुले प्रकरणात पोलीस आणि टाकळी गावातील लोकं काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बातमी शेअर करा
