बीड दि.१४(प्रतिनिधी):शहरातील बार्शी रोडवरील धांडे नगर परिसरात रविवारी (दि. १४) रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या दरम्यान भरधाव वेगातील एका चारचाकी एर्टिगा वाहनाने दोन वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार युवक थोडक्यात बचावला असून वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अधिक माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या एर्टिगा कारने प्रथम रस्त्यावरील दुचाकीला धडक दिली, त्यानंतर एका चारचाकी वाहनालाही जोरदार धडक बसली. अपघातस्थळाच्या बाजूलाच मोठा नाला असल्याने दुचाकीस्वार युवक मोठ्या दुर्घटनेतून बचावल्याचे सांगितले जात आहे. गेल्या चार महिन्यापासून या नाल्याचे काम रखडल्याने यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त केला, या नाल्यामध्ये एखादी जीवित हानी गेल्यावरच नाला करणार आहात का असा देखील स्थानिक नागरिकांनी सवाल केला. या अपघातात दुचाकी क्रमांक MH23AM6375 तर चारचाकी वाहन MH22BH4411 हे नुकसानग्रस्त झाले आहे. संबंधित दुबाकीस्वार युवक हा परीक्षेसाठी बीड येथे आल्याची माहिती समोर येत असून, अपघातानंतर तो वाहन जागीच सोडून परीक्षा देण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे यामुळे दुचाकी स्वराचे नाव मात्र समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल आले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेऊन ती शिवाजीनगर पोलीम ठाण्यात हलवली असून दोन्ही चाहनांना धडक दिलेल्या चारचाकीचा वाहन चालक पोलिसांनी ताब्यात घेतला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा
