मुंबई : प्रतिबंधित गुटखा, पानमसालाबरोबरच खाद्यपदार्थ्यांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. दुधात भेसळ करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असा सज्जड दम त्यांनी दिला आहे. त्यामुळे दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ केली जाते. दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून वारंवार कारवाई करूनही दूध भेसळीला आळा घालण्यात अन्न व औषध प्रशासनाला फारसे यश येत नाही. अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी बनावट औषधे, गुटखा, पानमसाला आणि खाद्यपदार्थ्यांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत अवघ्या १५ दिवसांत कोट्यवधींचा माल जप्त करून जवळपास २५० हून अधिक व्यक्तींवर कारवाई करून त्यांना अटक केली आहे.
डेअरी चालकांना इशारा
बनावट औषधे, गुटखा, पानमसाला आणि खाद्यपदार्थ्यांमध्ये भेसळ करणाऱ्यांपाठोपाठ आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा दूध उत्पादक, वितरक आणि डेअरी चालकांकडे वळवला आहे. तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी मुंबईतील एफडीए मुख्यालयात महाराष्ट्रातील प्रमुख डेअरी चालकांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत दुधात पाणी किंवा इतर घातक पदार्थांची भेसळ अजिबात सहन केली जाणार नाही, असे मुंढे यांनी डेअरी चालकांना सुनावले.

