Advertisement

सुंदरराव जाधव यांचे निधन

प्रजापत्र | Friday, 12/06/2026
बातमी शेअर करा

नेकनूर दि.१२(वार्ताहार): बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सेवा सहकारी सोसायटी,नेकनूरचे माजी संचालक सुंदरराव ज्ञानोबा जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक अभ्यासू, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.  
     सुंदरराव जाधव यांनी आपल्या कार्यकाळात बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली. सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि सर्वसामान्य शेतकरी व सभासदांच्या हितासाठी घेतलेले निर्णय यामुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. तसेच सेवा सहकारी सोसायटी, नेकनूरचे संचालक म्हणूनही त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले.त्यांच्या शांत, मनमिळावू आणि मदतीच्या स्वभावामुळे त्यांना समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांचा आदर प्राप्त झाला होता. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते तसेच परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. ते वृद्धापकाळाने त्रस्त असून काही दिवसांपासून उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ.सुनील जाधव आणि शिवाजी जाधव यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नेकनूर परिसरात शोककळा पसरली आहे.

Advertisement

Advertisement