छत्रपती संभाजीनगर: अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून राज्यात भेसळ माफिया आणि गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातील ७ जिल्ह्यांमध्ये एफडीएने एकाच वेळी धडक मोहीम राबवत भेसळ माफियांना मोठा दणका दिला आहे. १ जून ते ९ जून २०२६ या अवघ्या ९ दिवसांच्या कालावधीत विभागात तब्बल २७ ठिकाणी धाडी टाकून २ कोटी ४७ लाख ७५ हजार रुपयांचा प्रतिबंधित आणि संशयित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
या धडक कारवाईत ९ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून ६ मोठ्या आस्थापना प्रशासनाकडून सील करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत करकरले यांनी दिली आहे. एफडीएच्या पथकांनी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या ७ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही छापेमारी केली.
९ एफआयआर; गुंडांच्या गाड्याही केल्या जप्त….
या मोहिमेत एफडीएने केवळ माल जप्त केला नाही तर कायदेशीर बडगाही उगारला आहे. ९ दिवसांत झालेल्या या कारवाईची आकडेवारी पुढीलप्रमाणे:
एकूण छापेमारी: २७ ठिकाणी धाडी
जप्त माल: २ कोटी ४७ लाख ७५ हजार रुपये
गुन्हे (FIR) दाखल: ९ गुन्हे नोंदवले
अटक आरोपी: ९ जणांना बेड्या
सील केलेल्या आस्थापना: ६ दुकाने/गोडाऊन सील
जप्त वाहने: ८ वाहने (किंमत सुमारे ७५ लाख ५० हजार रुपये) गुटखा वाहतूक करताना जप्त.
भेसळ माफियांचे रॅकेट उद्ध्वस्त; मोहीम सुरूच राहणार
सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि प्रतिबंधित पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. सहाय्यक आयुक्त श्रीकांत करकरले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मोहीम इथेच थांबणार नसून आगामी काळात संपूर्ण मराठवाड्यात अधिक तीव्र केली जाणार आहे. या कारवाईमुळे विभागातील मोठ्या अन्न भेसळ करणाऱ्या रॅकेटचे कंबरडे मोडले आहे.

