राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ज्यावेळी फूट पडली होती, त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या 'राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण?' या प्रश्नाला उत्तर देताना स्वतः शरद पवारांनी 'शरद पवार' हे उत्तर दिले होते, त्यालाही आता एखाद्या महिन्यात ३ वर्ष होतील. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला, त्यानंतरचे अजित पवारांचे अकाली निधन, त्याचवेळी सुरु झालेल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चा, शरद पवारांनी केलेली मोदींची स्तुती हे सारेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा रस्ता नेमका कोणता याबाबत प्रश्न निर्माण करणारे आहे. पक्षाच्या २७ वर्षाच्या वाटचालीत या पक्षाने मारलेल्या अनेक राजकीय कोलांटउड्या पाहता आगामी काळात आपली वैचारिक आश्वासकता टिकविण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी (शप) समोर असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज स्थापना दिन, खरेतर दोन्ही राष्ट्रवादी आजच स्थापना दिवस म्हणतात. एनडीएच्या बैठकीला अधिक महत्व देत राष्ट्रवादीने आपल्या स्थापना दिवसाचा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलला यातच या पक्षासाठी महत्वाचे काय हे समजून घेता येऊ शकते. दुसरीकडे राष्ट्रवादी (शप)चा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आज होत आहे. शरद पवार आज जिथे आहेत, त्या पक्षाला राष्ट्रवादी (शप) म्हणण्याची वेळ निवडणूक आयोगाने आणली असली आणि मधल्या काळात या पक्षाचा जनाधार घटला असल्याचे चित्र असले तरी राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार हेच चित्र महाराष्ट्राला माहित आहे. अगदी १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापन करताना तारिक अन्वर आणि पी.ए.संगमा हे आणखी दोघे शरद पवारांसोबत होते, तरीही राष्ट्रवादी ओळखली जायची ती शरद पवारांची म्हणूनच. आज त्या राष्ट्रवादीच्या स्थापनेला २७ वर्ष होत आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात, अगदी शरद पवार काँग्रेसमध्ये असतानापासून काँग्रेसमधील शरद पवारांचा गट असेल किंवा नंतरच्या काळातील त्यांचा राष्ट्रवादी, या पक्षाचा आमदार, खासदारांच्या संख्येचा एक 'भोज्जा' आहे,त्यापलीकडे जाऊन स्वबळावर राज्याची सत्ता मिळविण्यात काँग्रेसमधील शरद पवार गटाला किंवा राष्ट्रवादीला कधी यश आले नव्हते आणि त्यामुळे मग शरद पवारांचा सत्तावाद हा कायम सत्तेसाठीची समीकरणे 'जुळविण्याचा' आणि त्यासाठी कोणतीही बेरीज वजाबाकी करण्याचा असाच राहिलेला आहे. अगदी पुलोदच्या काळापासून शरद पवारांना कोणत्याही राजकीय विचाराचे स्पष्ट वावडे आहे असे कधी राज्याला दिसले नाही. आज जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते स्वतःला पुरोगामी, धर्मनिरपेक्ष असे काही म्हणवत असले तरी धार्मिक कट्टरता वाढविणाऱ्या घटना किंवा शक्तींना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष बळ देण्यात शरद पवारांची भूमिका कायम कळीची ठरलेली आहे. मग अगदी गुजरात दंगलीनंतर केंद्रात त्यावेळी संपुआचे सरकार असतानाही नरेंद्र मोदींच्या संदर्भाने कठोर पावले उचलण्यात शरद पवारांचा ठरलेला अडसर असेल किंवा अगदी २०१४ मध्ये शिवसेनेचे महत्व कमी करण्यासाठी शरद पवारांच्या पक्षाने भाजपला देऊ केलेला बाहेरून पाठिंबा असेल, शरद पवारांच्या राजकीय भूमिका भाजपला तीव्र विरोध करणाऱ्या आहेत असे कधी जाणवले नाही. नाही म्हणायला त्या पक्षाच्या काही नेत्यांची भाजपसोबत, भाजपच्या विचारधारेसोबत जाण्यात गोची होणार असल्याने असेल ते नेते, कार्यकर्ते आम्ही किती धर्मनिरपेक्ष आहोत हे सांगत असतात हा भाग वेगळा.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून या पक्षाने कोणता एक विचार जपला असेल तर तो सत्तेचा, पक्षाच्या, संघटनेच्या आणि जनतेच्या विकासासाठी देखील सत्ता आवश्यक असतेच, नाही असे नाही, आणि म्हणूनच असेल कदाचित, ज्या सोनियांच्या नेतृत्वाला विरोध करत राष्ट्रवादी स्थापन झाली, त्याच सोनियांच्या काँग्रेससोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सत्तेचा संसार केलाच. गुजरात असेल किंवा आणखी कोठे, अनेक ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिका भाजपच्या पथ्यावर पडल्या हे देखील पुसता न येणारे वास्तव. आणि मग त्यातूनच अप्रत्यक्षापेक्षा प्रत्यक्ष बरे अश्या 'स्पष्ट' भूमिकेतून असेल राष्ट्रवादीत फूट पडली आणि पक्षाला दोन तपे होत असताना अजित पवारांचे बंड झाले. त्यावेळी आता राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण? या प्रश्नाचे उत्तर देताना स्वतः शरद पवारांनी 'शरद पवार' हे उत्तर दिले होते. म्हणजे पक्षाच्या स्थापनेला २ तपे होत असताना देखील पर्यायी आश्वासक चेहरा या पक्षाला देता आला नाही. आता शरद पवारांची राजकीय इच्छाशक्ती कितीही तगडी असली तरी त्यांच्यासमोर वयामुळे येणारी बंधने आहेतच, ते राजकीय समन्वय घडवून आणण्यात आजही कोणालाही मात देऊ शकतात, मात्र प्रत्यक्ष जमिनीवर काय? आज त्यांच्याच पक्षात नेत्यांमधील गटबाजी आणि धुसफूस लपून राहिलेली नाही. दुसरीकडे शरद पवार मधूनच मोदींची स्तुती करतात, मधूनच टीका करतात त्यामुळे इंडिया आघाडीला शरद पवारांच्या पक्षाबाबत किती विश्वास वाटतो हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आज देशासमोर आणि राज्यासमोर भाजपचे तगडे आव्हान सर्वच प्रादेशिक पक्षांसमोर असताना शकले पडलेल्या प्रादेशिक पक्षाला आपली आश्वासकता आणि राजकीय विचारधारेची विश्वासार्हता टिकविण्याचे आणि ती सामान्यांच्या गळी उतरविण्याचे आव्हान घेऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुढचा प्रवास करावा लागणार आहे, फक्त हा भर उचलायला तितके सक्षम खांदे पक्षात किती आहेत यावर या पक्षाचे भवितव्य असणार आहे.

