पुणे : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील भौतिकशास्त्राचा शिक्षक तेजस हर्षदकुमार शहा आणि लातूरचा डॉक्टर मनोज शिरूरे यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाने पाच दिवसांची ‘सीबीआय’ कोठडी सुनावली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या तेरावर पोहोचल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) स्पष्ट केले.
अटकेत असलेल्या निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याच्याकडून रसायनशास्त्राचे प्रश्न घेऊन ते लातूरमधील ‘आरसीसी’चा संचालक शिवराज मोटेगावकर याच्या मुलासह तीन विद्यार्थ्यांना देण्यात डॉ. शिरूरेची भूमिका असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.तेजस शहा हा पुण्यातील ‘डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकादमी’त भौतिकशास्त्राचा शिक्षक आहे. त्याचं नाव अटकेत असलेली शिक्षिका मनीषा हवालदार हिच्या पतीच्या फोनमध्ये 'गॉड' या नावाने सेव्ह केला आहे. शहाने हवालदारकडून त्याने भौतिकशास्त्राचे प्रश्न मिळविले होते. चौकशीत ही बाब निष्पन्न झाली. ‘सीबीआय’ने रसायनशास्त्राचा निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि लातूर येथील ‘रेणुकाई करिअर सेंटर’चा (आरसीसी) संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना यापूर्वीच अटक केली आहे. त्यांना दिल्लीतील न्यायालयाने बुधवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींकडून मोबाइल संच, लॅपटॉप आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे तांत्रिक विश्लेषण केले जात असून, त्यातून अनेक मोठी नावे पुढे येण्याची शक्यता आहे, तसेच पेपरफुटीच्या बदल्यात झालेल्या मोठ्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी आरोपींच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू आहे.पेपरफुटी प्रकरणात कथित मुख्य सूत्रधार असलेला पी. व्ही. कुलकर्णी, बिबवेवाडी भागातील ब्युटी पार्लरचालक मनीषा वाघमारे, जीवशास्त्राची शिक्षिका मनीषा गुरुनाथ मांढरे, भौतिकशास्त्राची शिक्षिका मनीषा हवालदार आणि शिक्षक तेजस शहा यांना सीबीआयने अटक केली आहे. या प्रकरणात रसायनशास्त्र विषयाशी संबंधित एका शिक्षिकेचीही चौकशी केली जात आहे.

