Advertisement

सोनसाखळी चोरणारे दोघे जेरबंद

प्रजापत्र | Sunday, 24/05/2026
बातमी शेअर करा

बीड दि.२४(प्रतिनिधी): दुचाकीवरून येत नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून दहशत निर्माण करणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा व आष्टी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जेरबंद केले आहे.  

  मिळालेल्या माहितीनुसार, (दि.३०) एप्रिल रोजी आष्टी परिसरात एक व्यक्ती पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी अशाच प्रकारच्या आणखी दोन घटना घडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू करत २५ हून अधिक गुन्हेगार वस्त्यांची पडताळणी केली, हिस्ट्रीशीटरांची चौकशी केली तसेच १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सीसीटीव्हीतील संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेत गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी विकास गडया भोसले (वय २२) रा. चिखली, ता. आष्टी याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने त्याचा साथीदार अरुण बप्पा काळे (वय २३) रा. बोलेगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्यासह चोरी केल्याची कबुली दिली.दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी बीड जिल्ह्यातील किमान तीन सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची प्राथमिक कबुली दिली आहे. आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून पुढील तपास आष्टी पोलीस करत आहेत. सदरील कारवाई नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक, बीड, पोलीस उपअधीक्षीक बाळकृष्ण हनपुडे पाटील, उपविभाग आष्टी, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा, बीड, शरद भुतेकर पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे आष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पो.ह. अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळु सानप, अर्जुन यादव, पो.अं.आशपाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे व पोलीस ठाणे आष्टी येथील पोलीस उपनिरीक्षक श्री.शिंदे, प्रविण क्षीरसागर, सत्यवान वाणी, श्री.तागड, श्री.तांबे,चालक सिध्देश्वर मांजरे यांनी केली.

Advertisement

Advertisement