Advertisement

संपादकीय- राष्ट्रवादी 'प्रायव्हेट लिमिटेड' होतेय का ? 

प्रजापत्र | Sunday, 17/05/2026
बातमी शेअर करा

कोणत्याही पक्षाची ओळख त्या पक्षाच्या प्रमुखामुळे असते हे आपल्या लोकशाहीचे ढळढळीत वास्तव आहे आणि मग साहजिकच पक्षाची धुरा पुढे त्याच नेत्याच्या वारसाकडे  येते ही देखील ही देखील आपली परंपरा , (याला भाजप अद्यापतरी अपवाद राहिला आहे हा भाग वेगळा.) पक्षाची धुरा जरी वारसाहक्काने येत असली  आणि त्यात कोणाला काही वावगे वाटण्याइतकी आपली लोकशाही प्रगल्भ नसली, तरी त्या पक्षाच्या उभारणीत केवळ ,एकाच कुटुंबाचे योगदान आहे आणि इतरांना किंमतच नाही असे म्हणून राजकारण चालत नसते , अशा पक्षांची पुढे राजकारणात फार काळ सरशी होत नाही. महाराष्ट्रापुरते सांगायचे तर जुन्या शिवसेनेला हा अनुभव आहे, आता राष्ट्रवादीची अवस्था तशीच 'प्रायव्हेट लिमिटेड'  होत आहे का असा प्रश्न पडावा  अशी परिस्थिती आहे.  

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात कोणी कितीही ओरड केली तरी घराणेशाही आहेच. अगदी काँग्रेसच्या घराणेशाहीवर ज्यांनी कायम तोंडसुख घेतले, त्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत देखील कितीही बंडाळ्या झाल्या तरी बाळासाहेब , त्यांच्यानंतर उद्धव आणि आता आदित्य पक्षाचे सर्वेसर्वा होऊ पाहत आहेत. शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली, नंतरच्या काळात हा पक्ष म्हणजे पवार कुटुंबाच्या सातबारावरचा असावा असाच चालला होता. नाही म्हणायला इतर हक्कात अधूनमधून आर पाटील, जयंत पाटील, छगन भुजबळ अशी नावे यायची. शरद पवार मुळात काँग्रेसच्या परंपरेतले, नियंत्रण एकाच ठिकाणी असले तरी दाखवायला का होईना वेगळे चेहरे लागतात, हे त्यांना काँग्रेस संस्कृतीने माहित होते, त्यामुळे एकसंघ राष्ट्रवादी असेपर्यंत पक्षाचे शक्तीस्थान जरी शरद पवार असले तरी दाखवायला का असेना वेगवेगळे चेहरे होते आणि त्या चेहऱ्यांना नाही म्हटले तरी किमान काही आवाज होता. अजित पवारांची जडणघडण देखील त्याच धाटणीतली , त्यामुळेच त्यांनी सुनील तटकरे , धनंजय मुंडे हे चेहरे दिमतीला घेतले, पक्षातून वेगळे व्हायचे म्हटल्यावर ज्या भुजबळांशी राजकारणात कायम अजित पवारांचा उभा दावा होता, त्या भुजबळांना देखील अजित पवारांनी सोबत घेतले, पटेल, वळसे हे 'मोठ्या साहेबांचे ' विश्वासू देखील त्यांनी सोबत ठेवले, कारण कठीण काळातून जाताना जरी अजित पवारांना तशी  राज्यभर मान्यता होती, तरी केवळ एका कुटुंबावर पक्ष चालविता येणार नाही इतकी राजकीय जाण  त्यांच्याकडे होती. अजित पवारांच्या अकाली जाण्याने आता राष्ट्रवादीत ती राजकीय जाण देखील त्यांच्यासोबतच गेली आहे का काय असे वाटावे अशी परिस्थिती  आहे.
मुळात पार्थ पवारांच्या राजकीय आकांक्षा , अजित पवार हयात असताना देखील कधी लपून राहिल्या नव्हत्या. शरद पवारांचा विरोध असतानाही लोकसभा निवडणूक लढविण्यापर्यंतचे घुमारे त्या आकांक्षांना फुटलेले होते हे राज्याने पाहिलेले आहेच. आता अजित पवारानंतर सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपदाची धुरा येणे साहजिकच होते, हा पक्ष अजित पवारांचा आहे असे अनेकांचे मत असू शकते, पण त्याचवेळी या पक्षाला राज्यातल्या वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या सुभेदारांनी मोठे केले हे देखील विसरून चालणार नाही . त्यामुळे पक्षातील सर्वच नेत्यांचे पक्षाच्या वाढीत, विस्तारात , पक्ष आज जेथे आहे त्यात नाही म्हटले तरी आपापल्यापरीने योगदान आहेच. मात्र आता राष्ट्रवादीत पार्थ आणि जय पर्व सुरु होतेय आणि त्या पर्वाला राष्ट्र्वादीतल्या जुन्या नेत्यांची जाणीव किंवा आवश्यकता राहिली नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रश्न केवळ प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख टाळण्याचा नाही, तर एकूणच पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सध्या पार्थ पवार 'आपलेच चालवू ' पाहत आहेत, ज्या पद्धतीने पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार असताना पार्थ आणि जय दोघांची कार्यकारिणीत वर्णी लागते आणि त्यांच्याकडे संघटना, शिस्तपालन आदी महत्वाचे विभाग दिले जातात , यावरून आता राष्ट्रवादीला
'पवार प्रायव्हेट लिमिटेड ' व्हायचे आहे का किंवा तसे करायचे आहे का असा प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे.
ज्यावेळी पक्षाचा प्रमुख तितका कणखर असतो , त्यावेळी असे 'लिमिटेड' होणे काही काळ चालतही , शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, मायावती, लालू यादव, मुलायमसिंह यादव, नितीश कुमार, करुणानिधी  यांनी हे दाखवून दिले, मात्र यांच्यासमोर ज्यावेळी राष्ट्रीय पक्षांचे तागडे आव्हान निर्माण होते, त्यावेळी असले लिमिटेड असणे अडचणीचे होते हे देखील तितकेच खरे आहे. आज राष्ट्रवादीच्या बाबतीत तर तास कणखर चेहरा म्हणावा अशीही परिस्थिती नाही. सुनेत्रा पवारांना अद्याप आपले राजकीय कौशल्य सिद्ध करायचे आहे. पार्थ पवार खरेच कणखर असते तर त्यांनी आतापर्यंत एखादा राज्यव्यापी दौरा काढून राष्ट्रवादीच्या सैरभैर झालेल्या नेते कार्यकर्त्यांना शक्ती आणि दिशा दिली असती, जय पवारांचे तर राजकारणातले पहिलेच पाऊल, मग असे असताना इतर कोणी नेते सोबत नसतील आणि केवळ कुटुंबाची राष्ट्रीय कार्यकारिणी ( कार्यकारिणीतील इतर चेहऱ्यांना पक्षाचे प्रभाव क्षेत्र असलेल्या महाराष्ट्रात किती स्वीकारार्हता आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही ) घेऊन सुनेत्रा पवारांना राज्याचे मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न कसे पाहता येईल ? एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी डाव टाकायला तयार आहेच आणि भाजप मित्र पक्षांसोबतच 'दावा साधतो ' हा इतिहास आहे, मग अशावेळी पक्ष जर 'प्रायव्हेट लिमिटेड' होणार असेल तर या पक्षाचे भवितव्य काय राहणार आहे ?
 

Advertisement

Advertisement