Advertisement

ट्रॅक्टरच्या धडकेत तरुणाचा मृत्यु

प्रजापत्र | Friday, 15/05/2026
बातमी शेअर करा

बीड दि.१५(प्रतिनिधी): शहरात आणि ग्रामीण भागात अपघातांची मालिका सुरूच असून, काल रात्री एका भीषण अपघातात तरुण मोटरसायकल-स्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे. ट्रॅक्टरने दिलेल्या जोराच्या धडकेत २५ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल साहेबराव वाघमारे (वय २५) रा. खाडे पारगाव, ता. बीड हा तरुण गुरुवारी (दि.१४)  रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटरसायकलवरून बीड शहराकडून खांडे पारगावकडे जात होता. अंथरवन पिंपरी शिवारातील तलावाजवळ आले असता, समोरून येणाऱ्या एका ट्रॅक्टरने त्याच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये राहुल वाघमारे हा गंभीररित्या जखमी झाला. अपघातानंतर त्याला तातडीने जिल्हा रुग्णालय बीड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात आणताच डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. राहुल वाघमारे या तरुणाच्या अपघाती मृत्यूने खांडे पारगाव परिसरात आणि वाघमारे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement