Advertisement

सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला

प्रजापत्र | Monday, 04/05/2026
बातमी शेअर करा

पुणे : बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत २४ व्या फेरी अखेर सुनेत्रा पवारांना २ लाख १८ हजार ९३० इतकी मते मिळाली आहेत. उत्तर प्रदेशच्या साहिबाबाद मधील सुनील कुमार शर्मा यांचा रेकॉर्ड सुनेत्रा पवारांनी मोडला आहे. २०२२ च्या निवडणुकीत सुनील कुमार शर्मांना २ लाख १४ हजार ८३५ मते मिळाली होती. २४ व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना बारामती पोटनिवडणुकीत २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली आहेत. 

   तब्बल २ लाख मताधिक्याचा विक्रमी टप्पा पार करत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी अवघे ५८.१७ टक्के मतदान झाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर प्रमुख राजकीय पक्षांचा एकही उमेदवार नसल्याने महायुतीकडून विक्रमी मताधिक्याचा दावा करण्यात येत होता. आता सर्वाधिक मताधिक्य मिळवून सुनेत्रा पवार बारामतीच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे. बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर होता. २०१९ मध्ये त्यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा एक लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने पराभव केला होता. त्यामुळे आता विक्रम मोडण्यासाठी एक लाख ६५ हजार २६६ हा जादुई आकडा लागणार होता. तो विक्रमही सुनेत्रा पवार यांनी मोडला आहे. राष्ट्रीय पातळीवर सुनेत्रा पवार यांना मिळालेल्या मतांची नोंद झाली आहे.  

या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर २२ उमेदवार होते. त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षाचा एकही उमेदवार नाही. नोंदणीकृत राजकीय पक्ष असलेल्या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे आर. वाय घुटूकडे हे होते. ते मूळचे सोलापूरमधील आहे. हिंदुस्थान जनता पार्टीचे सतीश कदम हे उमेदवार होते. ते जत येथील आहेत. उर्वरित २० जण हे अपक्ष होते. त्यामध्ये बारामतीतील आठजण आहेत. अन्य अपक्ष हे बारामतीबाहेरील आहेत. त्यात धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आणि ‘बिग बॉस मराठी’मधील अभिजित बिचुकले यांचा समावेश आहे. या सर्व २२ जणांना मिळून ४ हजार ८३७ मते मिळाली आहेत.  

Advertisement

Advertisement