बीड दि.२५ (प्रतिनिधी): बीड ,जालना, परभणी या जिल्ह्यात तलाव, नदी व विहिरीवरी विद्युत पंप आणि वायर चोरी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने अटक करुन या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला असून त्यांच्याकडून दोन मोटारसायकल व १ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विद्युत पंप आणि वायर चोरी करणारी टोळी ही मध्यप्रदेश राज्यातील असून, ते दिवसा रुद्राक्ष विक्री करीत रेकी करुन रात्री चोऱ्या करीत असल्याची माहिती
स्थानिक गुन्हे शाखेला मीळाली होती. तसेच सध्या ही टोळी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी एक पथक नांदगाव येथे पाठवून दिले.पथकाने नांदगाव येथे जावून संशयितांचा शोध घेवून धर्मेंद्र सुक्कल पारधी रा. विलेगे बुढा पोस्ट, सुगावन जि. कटनी (मध्यप्रदेश), शेख शफीक शेख बाबू रा. माजलगाव व एक विधीसंघर्षग्रस्त बालक असे तिघांना ताब्यात घेवून विचारणा केली असता त्यांनी बीड जिल्ह्यात माजलगाव व केज येथील वेगवेगळ्या ठिकाणावरील नदी व तलावातून ८ साथिदारांच्या मदतीने वायर चोरी केले असल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातुन गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल १ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींनी माजलगाव व केज उपविभागातील एकुण ६ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी केज पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उर्वरीत ८ फरार आरोपींचा व चोरी केलेल्या मुद्देमालाचा स्थानिक गुन्हे शाखा, बीड व केज पोलीस शोध घेत आहेत. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोह महेश जोगदंड, जफर पठाण, दिलीप गित्ते, बप्पासाहेब घोडके, चालक गणेश मराडे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
