बीड जिल्हा कारागृहातील एका कैद्याचा कथित आवाज असलेली एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल केली जात असून त्यावरून बीड जिल्हा कारागृहाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. सदर ऑडिओ क्लिपमध्ये दावा केल्याप्रमाणे जर खरोखरच कारागृहात एखाद्या कैद्याला इतर कैद्यांकडून मारहाण होत असेल तर ते प्रकरण गंभीरच आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हायलाच हवी, पण त्याचवेळी तुरुंगात असलेल्या कोणत्यातरी कैद्याला तिसऱ्या व्यक्तीला बोलण्याची संधी मिळते आणि त्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप कोणीतरी भलताच बनवतो हा प्रकार आणखी गंभीर आहे. कारागृहातील लोकांना इतके 'खुले ' संभाषण करता येणार असेल तर मग कायदा सुव्यवस्था उरली आहे कुठे असे म्हणण्याची वेळ आली आहे. अगोदरच मागच्या काही काळात राज्यभरातच कोणत्याही ऑडिओ, व्हिडीओ क्लिपचा खेळ जीवघेणा बनत असतानाच आता कारागृहातून देखील संभाषण होणार असेल आणि त्याच्या ऑडिओ क्लिप येणार असतील तर काय ?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या काही आरोपींनी इतर प्रकरणातील आरोपींच्या मदतीने कारागृहातील एका कैद्याला मारहाण केली आणि त्यात सदर कैदी जखमी झाला असे भासविणारी ( भासविणारी यासाठी की त्या कथित मारहाणीची आणखी कोणीही पुष्टी केलेली नाही किंवा सदर कैद्याने देखील अधिकृतपणे कोठे तक्रार केलेली नाही ) ऑडिओ क्लिप सध्या जोरात व्हायरल होत आहे. असे काही समोर आले की माध्यमे असतील किंवा समाजमाध्यमे यांच्यात ते व्हायरल करण्याची जणू काही स्पर्धाच लागते , त्या न्यायाने सदरील ऑडिओ क्लिप मोठ्याप्रमाणावर व्हायरल झाली, माध्यमांसाठी तो बातमीचा विषय बनला आणि लगेच बीडचे जिल्हा कारागृह आणि तेथील कारभारावर प्रश्नचिन्ह लावले जाऊ लागले. असल्याचं अनेक घटनांनी मागच्या काही काळात बीडची मोठ्याप्रमाणावर बदनामी झाली.
त्या ऑडिओ क्लिपमध्ये सांगितले जात आहे त्या प्रमाणे एखाद्या कैद्याला खरोखर कारागृहात अमानुष मारहाण झाली असेल तर ते गंभीरच आहे. त्याची सखोल चौकशी व्हायला हवी. हे होत असताना कारागृह प्रशासन मूक दर्शक बनले असेल तर त्यांच्यावर देखील कठोरातली कठोर कारवाई व्हायला हवी. कारागृहातील ज्याला मारहाण झाल्याचे सांगितले किंवा भासविले जाते तो कैदी न्यायालयीन बंदी असेल तर उचित न्यायालयाने देखील त्याची दखल घ्यायला हवी , कारण तो न्यायालयाच्या कोठडीत आहे. असले प्रकार कोठेच, कोणत्याच पातळीवर खपवून घेतले जायला नकोतच .
पण त्यापलीकडचा महत्वाचा आणि तितक्याच गांभीर्याने घ्यावा असा प्रश्न आहे तो कारागृहात बंदिस्त असलेल्या एखाद्या कैद्याला कारागृहाबाहेरच्या त्या कैद्याशी थेट संबंध नसलेल्या कोणत्या व्यक्तीला मोबाईलवर बोलण्याची संधी मिळते कशी ? एका मोबाईलवर कैदी बोलतो, तो व्य्क्ती दुसऱ्या व्यक्तीला फोन लावून हे सारे रेकॉर्ड करा असे सांगतो आणि कथित रेकॉर्डिंग केली जाते. आपण कारागृहात बंदिस्त असलेल्या एखाद्या व्यक्तीचे बोलणे रेकॉर्ड करत आहोत याची जाणीव असताना देखील रेकॉर्ड करणाऱ्याला त्यात काही गैर वाटत नाही, यातच कायद्याचा धाक शिल्लक राहिला आहे का असा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. कारागृहाचे नियम आणि पुन्हा कोणत्याही व्यक्तीचा खाजगीपणा याचे काही संकेत आहेत . जर कारागृहातून असे कोणालाही थेट संवाद साधण्याचे स्वातंत्र्य कैद्यांना मिळत असेल तर ते देखील गंभीरच आहे, त्याचीही चौकशी करण्याची धमक आता कारागृह प्रशासनाने दाखवायला हवी. कोणीही कोणाला बोलायचे आणि तिसऱ्या व्यक्तीने त्याची रेकॉर्डिंग करायची असा खेळ आज जरी कोणाला एखाद्याच्या फायद्याचा , कोणाला तरी 'न्याय मिळवून देण्याचा ' वाटत असला तरी हा खेळ समाज स्वास्थ्यासाठी घातक आहे. असल्याच कसल्याही ऑडिओ, व्हिडीओ क्लीपने मागच्या काळात सामाजिक वातावरण कलुषित झालेले आहे. त्यामुळे असले प्रकार देखील प्रशासनाने तितक्याच गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

