Advertisement

जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला

प्रजापत्र | Monday, 20/04/2026
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.२०(प्रतिनिधी): शेतजमिनीच्या बांधावरून असलेल्या जुन्या वादातून एका शेतकऱ्यावर दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना तालुक्यातील माकेगाव येथे घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यावर लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   माकेगाव येथील संजय उद्धवराव देशमुख (वय ४६) यांनी फिर्याद दिली आहे. संजय देशमुख आणि त्यांचे चुलते कल्याण जीवनराव देशमुख यांचे त्यांच्याच नात्यातील नारायण बाबूराव देशमुख यांच्याशी गेल्या दोन वर्षांपासून शेतीच्या बांधावरून घरगुती वाद सुरू आहेत. गुरुवार (दि.१६) रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास संजय आणि कल्याण देशमुख हे गावातील रोडवर नवनाथ टेलरच्या दुकानाजवळ जळालेल्या मोटरच्या दुरुस्तीबाबत बोलत थांबले होते.यावेळी नारायण बाबूराव देशमुख, अमर नारायण देशमुख आणि अयोध्या नारायण देशमुख हे तिघे आपसात संगनमत करून त्या ठिकाणी आले. ‘तुला लय माजलास, तुला आता खतमच करून टाकतो’ असे म्हणत नारायण देशमुख यांनी कल्याण यांना पकडले, तर अमर देशमुख याने हातातील दगडाने त्यांच्या डोक्यात जोरात मारहाण केली. नारायण यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर अयोध्या देशमुख यांनी शिवीगाळ केली. या हल्ल्यात कल्याण देशमुख बेशुद्ध पडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.जखमी कल्याण यांना तातडीने अंबाजोगाईतील सरकारी रुग्णालयात आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली असून ते सध्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ मुरलीधर जगताप या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement