Advertisement

 राज्यात आजपासून वादळी पावसाचा प्रभाव वाढणार

प्रजापत्र | Monday, 20/04/2026
बातमी शेअर करा

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाटेसदृश्य परिस्थिती असून दुसरीकडे दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण कोकणातील काही ठिकाणी पावसाची नोंद होत आहे. आज पहाटे पुणे, सांगली, जिल्ह्यातील पलूस, तासगाव आणि शिराळा येथे पाऊस आणि गारपिटीची नोंद झाली. पुढील चार दिवस राज्यातील काही भागात पावसाळी हवामान राहणार असून सोमवारपासून उष्णतेची तीव्रता कमी होईल, असे हवामान विभागाने सांगितले.

सध्या राज्यात पश्चिमी विक्षोभाची (वादळाची) स्थिती असून तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने राज्यात पावसाळी हवामान आहे. राज्यात आजपासून पावसाचा प्रभाव वाढणार असून यामुळे बहुतांश भागात आज पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले. यामुळे कोकण प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून या प्रदेशातील काही भागांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. राज्यातील काही भागात पुढील तीन दिवसात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.देशात आणि राज्यात मुख्यतः मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून एप्रिलच्या सुरुवातीच्या दिवसात पश्चिमी विक्षोभाची स्थिती होती. यामुळे उत्तेरतील अनेक राज्यांसह महाराष्ट्रातील दक्षिण कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी पाऊस तर काही ठिकणी गारपीटीचीही नोंद झाली. त्यांनतर राज्यात उष्णतेची लाटेसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून विदर्भासह, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. आता पुन्हा पश्चिमी विक्षोभाची स्थिती निर्माण झाली असून तीव्र उष्णतेपासून काही काळ राज्यातील नागरिकांना दिलासा मिळेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

 

‘यलो अलर्ट’ कुठे ?
नंदुरबार, धुळे, नाशिक आणि नाशिक घाट विभाग, अहिल्यानगर, रायगड, पुणे आणि पुणे घाट विभाग, सातारा आणि सातारा घाट विभाग, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर आदी भागांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या भागांतील काही ठिकाणी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Advertisement

Advertisement