Advertisement

बसमध्ये चढताना महिलेचे दागिने लंपास

प्रजापत्र | Thursday, 16/04/2026
बातमी शेअर करा

केज दि.१६(प्रतिनिधी): गावाकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन मणी मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेत लंपास केल्याची घटना केज येथील बसस्थानकात घडली. संबंधित महिलेने गळ्याला हात लावलेल्या संशयित महिलेस धरून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

उत्तरेश्वर पिंप्री (ता. केज) येथील अनुसया विक्रम चंदनशिव या १५ एप्रिल रोजी कामानिमित्त केजला आल्या होत्या. परत गावाकडे जाण्यासाठी दुपारी ३ वाजता नांदूरघाट बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किंमतीचे ७ ग्रॅमचे दोन मणीमंगळसूत्र लंपास केले. याचवेळी त्यांच्या पाठीमागून गळ्याला हात लावून मणीमंगळसूत्र चोरत असल्याचा संशय आल्याने त्यांनी लगेच हात पकडला. दोन ते तीन वर्षाचे मूल कडेला घेऊन असलेल्या वैशाली शिवाजी धोत्रे (रा. हनुमान नगर, पाथरी ता. जि. परभणी) या महिलेस पकडून तिच्याकडे चोरीला गेलेल्या मणीमंगळसूत्रची मागणी केली. मात्र तिने परत न केल्याने बसस्थानकावर ड्युटीस असलेले होमगार्ड प्रकाश मस्के यांनी महिला होमगार्ड काकडे व गव्हाणे यांना बोलवून या महिलेस ताब्यात दिले. अनुसया चंदनशिव यांच्या फिर्यादीवरून वैशाली धोत्रे या संशयित महिलेविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार राजू वाघमारे हे तपास करताहेत. दरम्यान, या महिलेस न्यायालयात हजर केले असता १८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Advertisement

Advertisement