Advertisement

अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं

प्रजापत्र | Tuesday, 14/04/2026
बातमी शेअर करा

नाशिक : अहोरात्र मेहनत करूनही पोलीस भरतीत अवघ्या दोन गुणांनी अपयश आल्याने एका तरुणीने आपले जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना नाशिक  जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथे घडली आहे. प्रतीक्षा शिवाजी सुरुडे (वय २०) असे या मृत तरुणीचे नाव असून, तिच्या या टोकाच्या पावलामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
       याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा ही गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मेहनत घेत होती. शनिवारी (दि.११) सकाळी अकराच्या सुमारास तिने आपल्या राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. घरातील सदस्यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तातडीने घोटी पोलिसांना पाचारण केले. या प्रकरणी योगेश्वर विष्णू सुरुडे यांनी पोलिसांना प्राथमिक माहिती दिली.नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेचा निकाल प्रतीक्षासाठी धक्कादायक ठरला. या भरतीचे मेरिट १२७ गुणांवर बंद झाले होते, तर प्रतीक्षाला १२५ गुण मिळाले होते. अवघ्या दोन गुणांनी वर्दीचे स्वप्न भंगल्याने प्रतीक्षा प्रचंड मानसिक दबावाखाली आणि नैराश्यात होती. ही दोन गुणांची तफावत ती सहन करू शकली नाही आणि याच नैराश्यातून तिने आपले आयुष्य संपवल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.प्रतीक्षा अत्यंत मेहनती आणि जिद्दी स्वभावाची होती. आपल्या कष्टाच्या जोरावर पोलीस दलात सामील होऊन कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे तिचे स्वप्न होते. घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

Advertisement

Advertisement