बीड दि.१० (प्रतिनिधी): केज तालुक्यातील मस्साजोग येथे मध्यरात्री सात ते आठ ठिकाणी घरफोडीच्या घटना समोर आल्या आहेत. या गावचे दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी ज्या वेळी ही घटना घडली त्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत होते. ही चोरी मध्यरात्रीच्या सुमारास अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
एकाच रात्रीत चोरट्यांनी ठिकठिकाणी धुडगूस घालून ऐवज लंपास केला असून शेतकऱ्यांच्या कॉपर केबलची मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याचे समोर आले आहे. दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख, त्यांची आई आणि कुटुंबातील इतर सर्व सदस्य घरात उपस्थित होते. हे सर्व सदस्य आपापल्या खोलीत झोपलेले असताना चोरट्यांनी घरात प्रवेश केला. विशेष म्हणजे, घरात इतकी माणसे असतानाही कोणालाही या चोरीचा सुगावा लागला नाही. सकाळी जेव्हा घरातील सदस्य झोपेतून जागे झाले, तेव्हा त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरी झाल्याचे लक्षात येताच कुटुंबाने तातडीने आरडाओरडा केला आणि या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पथक तातडीने दाखल झाले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यास सुरुवात केली. पोलीस प्रशासनाकडून सध्या वेगाने तपास चक्रे फिरवली जात असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान चोरट्यांनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे कॉपर केबल चोरीला गेले आहेत. तब्बल ७ लाखापर्यंतचे केबल चोरी गेले असून पोलिसांनी तातडीने या चोरीचा तपास करावा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.

