Advertisement

पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

प्रजापत्र | Thursday, 09/04/2026
बातमी शेअर करा

दिल्ली : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ अजित पवार यांनी राज्यसभाखासदार म्हणून शपथ घेतली. अलीकडेच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत पार्थ अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली होती. यानंतर आता दिल्लीत देशाचे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी पार्थ अजित पवार यांना खासदारकीची शपथ दिली. 

     पार्थ अजित पवार यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आवर्जून उपस्थित होत्या. सुनेत्रा पवार यांच्यासह खा.सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. पार्थ पवार यांनी इंग्रजीतून खासदारकीची शपथ घेतली. या शपथविधीच्या वेळेस पार्थ पवार यांच्या लूकची चर्चा आता रंगू लागली आहे. 

खासदारकीची शपथ घेताना पार्थ पवार यांनी अजितदादा परिधान करायचे तसेच गुलाबी जॅकेट परिधान केल्याचे पाहायला मिळाले. पार्थ पवारांच्या एकंदरीत लूकमुळे अजित पवारांचीच आठवण झाल्याचे म्हटले जात आहे. पार्थ पवारांच्या या लूकची सध्या राज्यभर चर्चा रंगली आहे. पार्थ पवार यांच्या या पहिल्याच संसदेतील प्रवेशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रतिनिधित्व देश पातळीवर प्रबळ होणार आहे. पार्थ पवार प्रथमच खासदार म्हणून संसदेत प्रवेश करत आहेत.

दरम्यान, सुनेत्रा अजित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट करत पार्थ पवार यांना मायेचा सल्ला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस परिवारासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा आहे. पार्थ अजित पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेत लोकसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. देशाचे उपराष्ट्रपती सीपी. राधाकृष्णन जी यांनी त्यांना खासदारकीची शपथ दिली. जनतेच्या विश्वासाचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्या माध्यमातून तरुण नेतृत्वाला नवी दिशा मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त करते. लोकहित, विकास आणि जनकल्याण यांना केंद्रस्थानी ठेवून ते संसदेत प्रभावीपणे कार्य करतील, अशी खात्री आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!

Advertisement

Advertisement