Advertisement

भूम नगरपरिषदेचा 'रस्ते घोटाळा' न्यायालयाच्या रडारवर

प्रजापत्र | Tuesday, 07/04/2026
बातमी शेअर करा

धाराशिव  दि.७(प्रतिनिधी): भूम नगरपरिषद क्षेत्रात आधीच सुस्थितीत असलेल्या रस्त्यांवर पुन्हा कोट्यवधींचा निधी खर्च करून सरकारी तिजोरीची लूट केल्याच्या आरोपावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कडक पवित्रा घेतला आहे. मंगळवार (दि.७) रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने संबंधित गुत्तेदाराला दिली जाणारी पुढील ५० कोटी रुपयांची रक्कम तातडीने रोखण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि राज्य शासनाला सखोल प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत जाब विचारला आहे.

      सविस्तर माहिती अशी कि,अबासाहेब मस्कर,संताजी सुपेकर आणि चंद्रमणी गायकवाड या स्थानिक नागरिकांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या मते, भूम नगरपरिषदेने ९ जून २०२३ रोजी ₹९५,६२,२३,२५०/- (सुमारे ९५.६२ कोटी) किमतीची ई-निविदा काढली होती. ही निविदा 'सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजने' अंतर्गत सिमेंट रस्ते आणि गटारींच्या कामासाठी होती.

याचिकेतील गंभीर आरोप: जुन्याच रस्त्यांचे नवे 'नामकरण': प्रशासक आणि शहर अभियंता यांनी संगनमत करून केवळ जुन्या रस्त्यांची नावे बदलून नवीन प्रस्ताव सादर केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

निधीचा अपव्यय: जे रस्ते अवघ्या ६ ते ८ महिन्यांपूर्वी किंवा २ वर्षांच्या आत पूर्ण झाले आहेत आणि जे आजही वापरण्यायोग्य आहेत, त्याच रस्त्यांवर पुन्हा सरकारी पैसा ओतण्याचा घाट घातला गेला.
दिशाभूल करणारी माहिती: सरकारला सादर केलेली रस्त्यांच्या स्थितीची माहिती खोटी आणि दिशाभूल करणारी असून, ती केवळ आर्थिक लाभासाठी देण्यात आली आहे.
निवडणूक काळातील प्रशासक: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने नगरपरिषदेवर प्रशासक नियुक्त आहेत. या काळात लोकप्रतिनिधी नसल्याचा फायदा घेऊन हा भ्रष्टाचार केल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. मंजूर झालेल्या नवीन कामाच्या शासन निर्णयामध्ये असे स्पष्ट नमूद आहे की मागील पाच वर्षांमध्ये या ठिकाणी कुठलेही काम झालेले नसल्याची खात्री नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी करावी असे असताना सुद्धा केवळ दोन वर्षांपूर्वी दुरुस्त झालेल्या रस्त्यांवर पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये निधी वितरित केला गेला व सुस्थितीत असलेल्या रस्त्यांना दुरुस्तीसाठी पुन्हा निविदा काढण्यात आली आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय केल्याचे आरोप या याचिकेमध्ये करण्यात आले आहेत.

न्यायालयाचे आदेश आणि पुढील दिशा: (कोरम मा. न्या. विभा कंकणवाडी व मा. न्या. वेणेगावकर)
याचिकेतील प्राथमिक पुराव्यांची दखल घेत उच्च न्यायालयाने गुत्तेदाराची मोठी रक्कम (५० कोटी) थांबवली आहे. तसेच, ज्या रस्त्यांचे काम नुकतेच झाले होते, त्यांच्यासाठी पुन्हा 'जीआर' (GR) काढून निधी कसा मंजूर झाला, याबाबत शासनाला स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. याचिकाकर्त्यांनी यापूर्वी १३ सप्टेंबर, २० सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी व आयुक्तांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या, मात्र प्रशासनाने त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने शेवटी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. आता नगरपरिषद मुख्याधिकारी आणि शासनाच्या शपथपत्रानंतर या प्रकरणातील मोठ्या माशांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या याचिकेमध्ये याची काकर्त्यांच्या वतीने ॲड. संभाजी टोपे व ॲड. गणेश कोरे हे बाजू मांडत आहेत तर शासनाच्या वतीने मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंग गिरासे आणि नगरपरिषद भूम च्या वतीने ॲड. विक्रम उंद्रे हे बाजू मांडत आहेत.

Advertisement

Advertisement