बीड दि. ३१ (प्रतिनिधी)-बीडच्या कायदा सुव्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी शिरावर घेऊन आलेल्या आणि कर्तव्यकठोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेला ठेंगा दाखवत बीड जिल्हा पोलिसात लाचखोरीच्या कहर झालेला पाहायला मिळत आहे.चकलांबा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर एसीबीची झालेली कारवाई ताजी असतानाच आता शेतकऱ्याला उसाची गाडी शेतातून जाऊन देण्यासाठी रस्ता मोकळा करण्यासाठी म्हणून लाच मागितल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्यावर एसीबीने कारवाई केली आहे. मागच्या दोन तीन महिन्यात बीड जिल्हा पोलीस दलातील अनेकांवर एसीबीने कारवाया केल्या आहेत. त्यामुळे या लाचखोरीला आता एसपी कसे उत्तर देणार हा प्रश्न सामान्यांना आहे.
सिरसाळा पोलीस ठाण्यातील कर्मचारी दत्ता नागनाथ निघूळ (वय-३६, रा. पोलीस निवास,सिरसाळा) याने तक्रारदारकडून उसाची वाहतूक करण्यासाठी अडवलेला रस्ता मोकळा करून देण्यासाठी दोन हजारांची मागणी आरोपीने २७ जानेवारी २०२६ रोजी केली होती तर एक हजार स्वीकारले होते. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली होती. दरम्यान, निघूळ याला तक्रारदारावर संशय आला, त्यामुळे त्याने फोन घेणे आणि भेटणे टाळले होते. मात्र, एसीबीने केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध झाली होती. या प्रकरणात अखेर दोन महिन्यानंतर एसीबीने कारवाईचा फास आवळला.मंगळवारी दुपारी संधी मिळताच बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या पथकाने निघूळ याला पोलीस निवासातून अटक केली. दत्ता निघूळ याच्यावर आता त्याच्याच सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एसीबीकडून दोन महिने 'संशोधन'
एसीबीकडे तक्रारदार याने दोन हजारांची लाचेची मागणी झाल्याबाबत कळविले होते.सदर प्रकार २७ जानेवारी २०२६ रोजी घडला होता.यात एसीबीला लाचेची मागणी करण्यात आल्याची खात्री तेव्हाच पटली होती. मात्र एसीबीने पुढे काही हालचाली केल्या नव्हत्या. अखेर या प्रकरणात कारवाईच्या निर्णयावर यायला एसीबीला दोन महिन्यांचा कालावधी लागला. नेमके दोन महिने एसीबीमध्ये या विषयावर कसले संशोधन सुरु होते हा प्रश्न निर्माण होत आहे.
वाळू आणि इतर विषयात लाचखोरी
बीड जिल्हा पोलीस दलात एसपी नवनीत कॉवत यांनी सुरुवातीपासून कठोर भूमिका घेत 'लाचखोरी' चालणार नसल्याचे वारंवार स्पष्ट केले.मात्र त्यांच्या या भूमिकेला त्यांच्याच अधिकारी कर्मचाऱ्यांनी ठेंगा दाखविल्याचे चित्र आहे.वाळू आणि इतर विषयात लाच घेताना आतापर्यंत अनेक पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कारवाया झाल्या आहेत.पाटोदा,गेवराई,माजलगाव,चकलांबा आणि आता सिरसाळयात एसीबीने फास आवळले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारची जबाबदारी नेमकी कोणाची असाही प्रश्न सामान्यांना पडलेला आहे.
माजलगावमधील लाचखोरीवर विधानसभेत चर्चा
माजलगावमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आल्यानंतर तेथील ठाणेप्रमुखाला बीडला संलग्न करण्यात आले होते. मात्र काही दिवसात त्यांना पुन्हा माजलगावला पाठविण्यात आले. त्यावर आ.प्रकाश सोळंके यांनी थेट विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी उत्तर देताना लाचेची मागणी केवळ कर्मचाऱ्याने केली, त्यात ठाणे प्रमुखाचा काही संबंध असल्याचे समोर आले नसल्याचे गृह विभागाच्या वतीने सांगण्यात आले होते.
कारवायांचे श्रेय अधिकाऱ्यांचे मग अपश्रेयांचे धनी कोण ?
पोलीस विभाग हा शिस्तीचा मानला जातो. येथे वरिष्ठांचे आदेश शब्दशः पाळण्याचे संकेत आहेत.त्यामुळेच अगदी एखादा चोरटा जरी पोलिसांनी पकडला तर त्याचे श्रेय थेट घटक प्रमुखापासून सुमारे अर्धा डझन अधिकाऱ्यांना दिले जाते.अमुक अमुक यांच्या मार्गदर्शनात तमुक कारवाई झाल्याचे सांगितले जाते.त्या अधिकाऱ्यांनी अशा कारवायांचे श्रेय घ्यायला देखील हरकत नाही, मात्र आता जेव्हा लाचखोरीच्या घटना घडतात,त्यावेळी त्याचे अपश्रेय कोणाचे या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नाही.

