Advertisement

हाताशी आलेल्या पिकांवर गारपिटीचा वरवंटा

प्रजापत्र | Saturday, 21/03/2026
बातमी शेअर करा

 छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ११ हजार ५७२ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस व गारपिटीमुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, मका, बाजरी यासह आंबा, मोसंबी फळबागांना फटका बसला.

 

   यात सर्वाधिक ८ हजार ४५५ हेक्टर क्षेत्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे. राज्यात १७ ते २२ मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, अवकाळी पावसात पडलेल्या विजांमुळे विभागात दोघांचा मृत्यू झाला तर ४१ लहान-मोठी जनावरे दगावली. तर ५३३ गावांतील २० हजार ८९६ शेतकरी बाधित झाले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानात ३३९७ हेक्टर जिरायत, ६९४४ बागायत तर १२२९ हेक्टर फळबागांचा समावेश आहे. पुढील एक ते दोन दिवस पावसाचा अंदाज आहे.

 

 

दोघांचा मृत्यु 

विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार, गुलाब मसाराव मारकड (वय ३३, रा. पातोंडा, ता. जि. हिंगोली) आणि दीपिका संजय राठोड (वय अंदाजे १६, रा. शिळवणी, ता. देगलूर, जि. नांदेड) या दोघांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.

 

एकूण ४१ जनावरे मृत्युमुखी

विभागात एकूण १८ मोठी, १५ लहान दुभती जनावरे, तर ओढकाम करणारी ७ मोठी आणि एका लहान जनावराचा अशा एकूण ४१ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

 

 

कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान?

जिल्हा             - बाधित शेतकरी संख्या - एकूण बाधित क्षेत्र

छत्रपती संभाजीनगर - १५३०२                         - ८४५५.७८

जालना             - २५६६                        - १३६४.२०

नांदेड             - ५६                         - ३४.२५

बीड                         - २६२                         - १५६

लातूर                        - ९४                         - ५२

धाराशिव             - २६१६                         - १५०९

एकूण                         - २०८९६             - ११५७२.१३

Advertisement

Advertisement