Advertisement

गॅस सिलिंडरचा अवैध साठा जप्त

प्रजापत्र | Saturday, 14/03/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.१४(प्रतिनिधी): येथील पेठ बीड पोलीस आणि पुरवठा विभागाने संयुक्तपणे कारवाई करत इमामपूर रोडवरील शिवनेरी नगर परिसरात आज पहाटेच्या सुमारास गॅस सिलिंडरचा मोठा अवैध साठा जप्त केला. या कारवाईत घरगुती आणि व्यावसायिक वापराचे एकूण २९ सिलिंडर हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. काळ्या बाजारासाठी हा साठा करून ठेवल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.

     पेठ बीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे यांना शिवनेरी नगर भागात अजय मोहनराव घोडके याने आपल्या राहत्या घरात गॅस सिलिंडरचा बेकायदा साठा केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी त्यांनी तातडीने बीड तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रशांत एकनाथ सुपेकर यांना पाचारण केले. त्यानंतर पोलीस आणि पुरवठा विभागाच्या पथकाने दोन पंचासह  मध्यरात्री दीडच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला. आरोपी अजय घोडके याच्या ताब्यातून इंडेन आणि एच.पी. कंपनीचे घरगुती तसेच व्यावसायिक वापराचे एकूण २९ सिलिंडर जप्त करण्यात आले. या साठ्याची एकूण किंमत ७३ हजार ७५० रुपये इतकी आहे. सदर साठा कोणत्याही परवान्याशिवाय बेकायदेशीरपणे साठवून ठेवल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले.प्रशांत सुपेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अजय मोहनराव घोडके याच्या विरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक साईनाथ बारगळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार आणि पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे व त्यांच्या पथकाने केली.

Advertisement

Advertisement