Advertisement

संपादकीय अग्रलेख- आततायी राजकारणाची फडफड

प्रजापत्र | Friday, 13/03/2026
बातमी शेअर करा

एखाद्या व्यक्तीला न्याय देण्याचा लढा ज्यावेळी स्वतःच्या राजकारणासाठी वापरण्याचा मोह आवरता येत नाही, त्यावेळी जो आततायीपणा समोर येतो तो सध्या परळीत अनुभवायला मिळत आहे. दिवंगत महादेव मुंडे यांच्या खुनाचा शोध लागलाच पाहिजे, मात्र एखाद्या दिवंगतांच्या कुटुंबाचा खांदा वापरून स्वतःचे राजकीय हिशोब चुकते करण्याची जी फडफड काहींनी सुरु केली होती, त्या फडफडीला ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याच विधानाने ब्रेक लागला आहे. मात्र यातून न्यायाच्या लढ्याच्या नावाखाली राजकीय हिशोब साधू पाहणारे देखील उघडे पडले आहेत.

कोणत्याही कुटुंबातील एखादा व्यक्ती जातो, म्हणजे त्याचा खून होतो त्यावेळी त्या कुटुंबाला होणाऱ्या वेदना कल्पनेच्या पलीकडच्या असतात. त्यातही आपल्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा खून होऊन वर्ष उलटल्यानंतर देखील हे सारे का झाले आणि कोणी केले हे देखील त्या कुटुंबाला कळणार नसेल तर त्या वेदनांना पारावार नसतो. हे आपल्या तपास यंत्रणेचे अपयश असतेच,त्या सोबतच कायद्याच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागावे असे देखील असते. परळीच्या महादेव मुंडे हत्या प्रकरणात हेच सारे घडले,त्यामुळे दिवंगत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जो लढा दिला आणि जे काही भोगले, त्यांच्या मागे साऱ्याच समाजाने आणि व्यवस्थेने देखील उभे राहायलाच हवे. ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या वेदनांचा आणि दुःखाचा पार कोणालाच कळणार नाही, ते दुःख ज्याच्या नशिबी येते, त्यालाच त्याची तीव्रता ठाऊक असते. त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या लढ्याला यश मिळायलाच हवे आणि यातील जे कोणी गुन्हेगार असतील ते जनतेसमोर यायलाच हवेत याबद्दलही दुमत नाही.
मात्र हे सारे होत असताना पीडित कुटुंबांच्या भावनांचे, वेदनांचे कोणी राजकारण करावे आणि स्वतःचे राजकीय हिशोब चुकते करण्यासाठी त्याचा वापर करावा हे देखील योग्य आणि समर्थनीय नक्कीच नाही. एखाद्या व्यक्तीच्या न्यायाच्या लढ्यात त्या व्यक्तीची पाठराखण करणे वेगळे आणि त्या न्यायाच्या नावाखाली स्वतःच्या सोयीने काहीही आरोप करून संपूर्ण प्रकरणच तिसरीकडे वळविणे वेगळे हे कोणीही लक्षात घ्यायला हवे होते. उशिरा का होईना आणि जनरेट्यामुळे का होईना, महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला पुन्हा गती आली, दिवंगत महादेव मुंडे यांच्या कुटुंबाने जे तपास अधिकारी मागितले, ते अधिकारी देऊन तपास सुरु झाला, संशयितांच्या ब्रेन मॅपिंग आणि नार्कोसारख्या तपासण्या देखील झाल्या, त्यातून काय समोर यायचे ते येईल , मात्र या तपासण्यांचे कोणतेही अहवाल हाती नसताना आपल्या राजकीय विरोधकाला यात थेट आरोपी करण्याची जी फडफड आपणच राजे आहोत या भावनेतून केली गेली ती मात्र राजकारण कोणत्या पातळीवर गेले आहे हे सांगणारी होती.राजकारण कोणी आणि कसे करावे याबद्दल आता काही धरबंध राहिलेला नाही, मात्र केवळ आपल्या राजकारणासाठी एखादी सनसनाटी निर्माण करून आपण केवळ आपल्या राजकीय विरोधकाला अडचणीत आणीत नाही,तर एखाद्याच्या न्यायाच्या लढ्याला देखील वेगळे वळण देतो इतके तरी भान ठेवणे अपेक्षित असते. जर एखाद्या व्यक्तीला ते भान नसेल तर त्या व्यक्तीच्या हाती अधिकार सोपविणाऱ्या त्या पक्षांच्या नेत्यांनी ते समजून सांगणे आवश्यक असते. कोणत्याही घटनेचे विकृत राजकरण करण्याच्या मानसिकतेचा परिणाम एकूणच सामाजिक स्वास्थ्यावर देखील होत असतो, मागच्या काही काळात बीड जिल्ह्याच्या बाबतीत हे सातत्याने होत आले आहे. कोणत्याही घटनेत,कोणत्याही प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायलाच हवी, कायद्याचा धाक देखील प्रस्थापित व्हायला हवा मात्र हे करताना कोणी कायदा आपल्यासाठी नाही असे समजून बेताल फडफड करणार असतील तर असल्या विकृती देखील समाजाच्या दृष्टीने उपयोगाच्या नक्कीच नाहीत.
हे बाकी कोणाला समजेल,नाही समजेल,मात्र ज्ञानेश्वरी मुंडे यांना हे समजले आणि त्यांनी त्यांचा न्यायाचा लढा वेगळ्या मार्गावर जाणार नाही याची खबरदारी म्हणून ठोस भूमिका घेतली, हे मात्र बरे झाले. शेवटी कोणत्याही प्रकरणात आपले ध्येय काय आहे हे समजून घेणे महत्वाचे असते, ते ज्ञानेश्वरी मुंडे यांना समजले, त्यांना कोणाच्याही राजकारणाशी देणेघेणे नाही, त्यांना त्यांच्या दिवंगत पतीला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि म्हणूनच त्यांनी राजकीय आरोप नको अशी भूमिका घेतली त्याचे स्वागतच केले पाहिजे, बाकी आपण म्हणजे कोणी 'राजे' आहोत आणि आपण काहीही बोलू शकतो या मानसिकतेतून कोणी फडफड करत असेल तर त्याला कायद्याने पाहून घ्यावे हेच कोणत्याही सशक्त सुसंस्कृत समाजव्यवस्थेत अपेक्षित असते.

Advertisement

Advertisement