Advertisement

रिक्षाचालकाने प्रवाशाला लुटले

प्रजापत्र | Thursday, 05/03/2026
बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर : प्रवासी तरुणाला चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील निर्मनुष्य परिसरात नेत मारहाण करुन रिक्षाचालकाने लुटले. ऑनलाईन तसेच रोख स्वरुपात त्याच्याकडील पैसे हिसकावून चालत्या रिक्षातून ढकलून देत तो पसार झाला. २८ फेब्रुवारी रोजी रात्री घडलेल्या घटनेप्रकरणी २ मार्च रोजी रात्री मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकासह त्याच्या दोन गुंड साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

     बीड जिल्ह्यातील गेवराईचा असलेला ओम संजय राठोड (१८) हा २८ फेब्रुवारी रोजी रामनगरमध्ये राहणाऱ्या मामाला भेटण्यासाठी शहरात आला होता. दिवसभर त्याला भेटून रात्री तो गेवराईला जाण्यासाठी निघाला. सिडको बसस्थानकावर जाण्यासाठी तो रामनगर विठ्ठलनगर रिक्षा थांब्यावर येऊन थांबला. समोर आलेल्या रिक्षात तो बसला. त्याच्या आधीच रिक्षाचालकाचे गुंड साथीदार प्रवासी म्हणून रिक्षात बसलेले होते. चालकाने रिक्षा बसस्थानकाऐवजी अचानक सुसाट वेगात धूत रुग्णालयाच्या दिशेने वळवून चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत नेली. ओम याला मारहाण करून धमकावले. अजिंठा फार्मा कंपनीच्या दिशेने जाणाऱ्या निर्मनुष्य परिसरातील मार्गावर नेत त्याच्या मोबाईलमधील डिजिटल वॉलेटमधून ऑनलाईन ३६० रुपये ट्रान्सफर करुन घेतले. त्यानंतर खिशातील २ हजार रुपये व मोबाईल हिसकावून रिक्षातून ढकलून देत पसार झाले. मुकुंदवाडी पोलिस तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement