भाजपने आता देशात धक्कातंत्र वापरणारा पक्ष हीच आपली प्रतिमा बनवलेली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ४ जागांवरील उमेद्वाऱ्या जाहीर करताना भाजपने पुन्हा एकदा त्याच धक्का तंत्राचा प्रत्यय दिला आहे. रामदास आठवले यांची उमेदवारी ही केवळ औपचारिकता होती, मात्र माया ईवनाते आणि रामराव वडकुते या चर्चेत नसलेल्या नावांना अचानक संधी देत भाजपने यावेळी मित्रपक्ष, पक्षनिष्ठ आणि जातीय समीकरणे असा समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
महाराष्ट्रातून निवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या ७ जागांसाठी भाजपने आपल्या वाट्याच्या ४ जागांवरील उमेदवार जाहीर केले. या ४ जागांसाठी महाराष्ट्रातून सुमारे २५ नावे कोअर कमिटीने पाठविली होती. मात्र भाजपमध्ये दिल्लीच्या मनात केव्हा काय येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कोणी कोणतीही नावे पाठविली तरी ऐनवेळी कोणाचेही नशीब भाजपमध्ये उजळू शकते याचा प्रत्यय आज पुन्हा आला.
भाजपला ४ पैकी एक जागा रिपाइंला देणे क्रमप्राप्त होते. आज आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या बहुतेक पक्षांनी महाराष्ट्रात भाजपपासून सुरक्षित अंतर ठेवलेले असताना रामदास आठवले मात्र भाजपसोबत आहेत आणि त्याकनही बाजू खंबीरपणे मांडत असतात. त्यामुळे भाजपने त्यांना राज्यसभेवर तिसऱ्यांदा संधी दिली आहे. या जागेची घोषणा होणारच होती, यात कोणाचे दुमत नव्हतेही . उत्सुकता होती ती इतर ३ जागांवर भाजप कोणाला संधी देते याची. भाजपातील एक निष्ठावान चेहरा आणि नव्या कार्यकारिणीतील राष्ट्रीय महासचिव असलेल्या विनोद तावडेंना संधी देऊन आपण निष्ठवंतांचा विचार करतो हा संदेश पक्षाने दिला आहे. विनोद तावडे यांनी यापूर्वी पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर देखील त्यांच्यावर पक्षाने टाकलेली जबाबदारी ज्या प्रभावीपणे निभावली त्याचे बक्षीस म्हणून किंवा त्याचा सन्मान म्हणून त्यांना राज्यसभेची संधी देण्यात आली आहे. त्यासोबतच विनोद तावडे हे राज्यातील मराठा चेहरा आहेत. सध्या राज्यातील राजकीय, सामाजिक वातावरणात जी एक प्रकारची अस्वस्थता आहे, त्या पार्श्वभूमीवर मराठा चेहरा राज्यसभेत देऊन भाजप आपण मराठा समाजाला सोबत घेऊन चालतो हे दाखविले आहे.
त्यासोबतच आदिवाणसाठी काम करणाऱ्या माया ईवनाते आणि धनगर समाजामधील नेते म्हणून ओळख असलेले रामराव वडकुते यांची नावे आश्चर्यजनकच आहेत. माया इवनातें या नागपूरच्या माजी महापौर, संघ परिवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातल्या आहेत. त्यांचे विदर्भातील आदिवासी समाजात काम असून असा दुलक्षित चेहरा शोधून त्या चेहऱ्याला संधी आपणच देऊ शकतो हा संदेश आता भाजप देत आहे. रामराव वडकुते हे मूळचे राष्ट्रवादीचे, मात्र काही वर्षांपूर्वी भाजपात आलेले , त्यांच्या माध्यमातून धनगर समाजाला आपलेसे करतांनाच राज्यातील सारीच जातीय गणिते संतुलित करण्याचा प्रयत्न भाजपने केलेला दिसतो.

बातमी शेअर करा
