Advertisement

संपादकीय अग्रलेख- झुंडशाही रोखून सलोखा टिकवावा  लागेल

प्रजापत्र | Monday, 23/02/2026
बातमी शेअर करा

पूर्वी जमावाला चेहरा नसतो आणि बहुतांशवेळा विवेक देखील नसतो असे म्हटले जायचे आणि मग त्यामुळेच अशा जमावाचा वापर करून अस्मितांचे राजकीय खेळ खेळले जायचे.आता त्याच जमावाची जागा समाजमाध्यमांमधील झुंडींनी घेतली आहे. या झुंडींची झुंडशाही सामाजिक सलोख्याला चूड लावत आहे आणि गावागावात द्वेष निर्माण करत आहे.राज्याच्या कोणत्या तरी कोपऱ्यात काही घडले,की लगेच त्या घटनेची संपूर्ण माहिती नसतानाही विखारी पोस्ट करायच्या, अर्धवट माहितीवर काही तरी स्फोटक व्यक्त व्हायचे आणि त्यातून सामाजिक वातावरण कलुषित करायचे असे प्रकार सर्रास सुरु आहेत आणि त्यातून महाराष्ट्र अंतर्गत जातीय विकाराच्या धगधगत्या ज्वलामुखीवर उभा आहे.याचे टोक गाठले गेले आणि या विकाराच्या ज्वालामुखीचा स्फोट झाला तर त्यात सारेच होरपळून निघणार आहेत.समाजमाध्यमांवरील झुंडींचे काहीच जाणार नाही,मात्र महाराष्ट्र धर्म आणि मराठी माणूस यात भस्मसात होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.त्यामुळे अशा झुंडशाहीला रोखून सामाजिक सलोख्यासाठी शासन,प्रशासन,लोकप्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते आणि माध्यमांनी देखील पुढाकार आणि भूमिका घेण्याची वेळ आली आहे.
 
      मागच्या काही काळात, विशेषतः मागच्या २-३ वर्षात महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याची वीण पूर्णतः उसवली आहे.आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून वेगवेगळे समाजघटक समोरासमोर आले इतकेच कारण त्याला नाही.आरक्षण मागणीची आंदोलने गैर आहेत असेही नाही,किंबहुना आपल्या हक्कांसाठी लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहेच.मात्र मागच्या काळात वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षण आंदोलनातून समाजासमाजामधील दारी जी वाढत गेली आणि त्यातून मग मूळ विषय बाजूला पडत कोणत्याही विषयाचे राजकीय भांडवल आणि त्यातून समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे जे प्रयत्न झाले ते फार गंभीर आहेत. समाजमाध्यमांमधील झुंडी याला मोठ्याप्रमाणावर कारणीभूत आहेत.
खरेतर महाराष्ट्राने कायम सामाजिक,राजकीय आंदोलनात देशाला दिशा दिलेली आहे.महाराष्ट्राची संतपरंपरा असेल,जिजाऊ,छत्रपतींचा प्रेरणादायी इतिहास असेल किंवा फुले,शाहू आंबेडकरांपासूनचा अनेक राजकीय सामाजिक विचारवंतांचा वैचारिक वारसा असेल,यशवंतराव चव्हाणांसारख्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी 'हे मराठी राज्य असेल,मराठा राज्य नसेल' असे सांगत सर्वसमावेशक राज्यकारभाराचा घालून दिलेला आदर्श असेल,हे महाराष्ट्राच्या मातीचे वैभव होते.मात्र आज त्याच महाराष्ट्रात सामाजिक वातावरण कमालीचे केवळ कलुषित नाही तर विखारी झाले आहे.समाजमाध्यमे आणि वेगवेगळ्या समाजघटकांचे नेते म्हणविणारांच्या भूमिका देखील याला मोठ्याप्रमाणावर कारणीभूत आहेत.कोणत्याही घटनेवर तडकाफडकी व्यक्त होण्याची जी असुरी स्पर्धा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे, त्या स्पर्धेने महाराष्ट्राच्या सामाजिक शांततेला सुरुंग लावला आहे.एखादे घटना ज्यावेळी घडते,तेव्हा त्याला अनेक बाजू असतात आणि त्या साऱ्या समोर आल्याशिवाय व्यक्त व्हायचे नाही अशी प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारण,समाजकारणात पूर्वी होती,मात्र आता ती प्रगल्भता दाखवायची कोणाची इच्छा नाही.प्रत्येक गोष्टीकडे,माहिती न घेता किंवा जाणीवपूर्वक राजकीय हेतूने व्यक्त होण्याचा जो सपाटा सर्वच स्तरांमधून लावला जात आहे,तोच या अशांततेचे मूळ आहे.
समाजमाध्यमे आणि माध्यमांमधील काही उतावीळ यांनी तर कहर केला आहे. समाजमाध्यमांमध्ये कोणीही कुठेही बसून काहीही व्यक्त होतो,मग एकाची पोस्ट इतरांकडून फॉरवर्ड केली जाते.जे काही व्यक्त केले जात आहे, त्यात तथ्य आहे का? या घटनेचे वास्तव काय? जो सुरुवातीला व्यक्त होतो त्याची राजकीय सामाजिक उंची किती किंवा त्याचे सामाजिक योगदान काय,ज्या विषयावर जो कोणी व्यक्त होतोय त्याचा त्या विषयाचा व्यासंग तर सोडा साधा अभ्यास तरी आहे का ? या कशाचाच विचार न करता सामाजिक मंचावर व्यक्त होत विखार पेरण्याचा प्रकार सर्वच पातळ्यांवर सुरु आहे आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेलय व्यवस्था यात वेळीच हस्तक्षेप करत नाहीत हे आणखी दुर्दैवी आहे.समाजमाध्यमांमधील या झुंडींना चेहरा नाही,अनेकांचे फेक अकाउंट असतात,काहींच्या टोळ्याच कोणाला तरी ट्रोल करण्यासाठी सज्ज असतात आणि त्यातून मग सामाजिक सलोखा बिघडत चालला आहे.
राजकीय,सामाजिक आयुष्यात एकमेकांवर टीका करण्याची देखील महाराष्ट्रात एक उंची होती.अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत असेल किंवा ब्राम्हण ब्राह्मणेतर किंवा इतर सामाजिक वाद महाराष्ट्रात निर्माण झाल्यानंतर असेल कोणीही कोणावरही कोणत्याही भाषेत तोंडसुख घ्यायचे असले प्रकार महाराष्ट्राने कधी पहिले नव्हते.छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणताना महाराजांनी त्यांच्या स्वराज्यात नियम पालनाला सर्वोच्च स्थान दिले होते याचा मात्र विचार केला जात नाही.उलट कोणत्याही गोष्टी नियम तोडून करायच्या आणि पुन्हा त्याला 'गनिमी कावा' ठरवायचे प्रकार सर्रास होत आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात कोणी नियम तोडण्याचा 'कावा' केला तर त्याला 'गनिमा' सारखी वर्तणूक दिली होती हा इतिहास जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला जात आहे.सामाजिक न्याय,कायदे,व्यवस्था,न्यायाची लढाई संवैधानिक मार्गानेच लढायची असते हे वास्तव या कशाचीच समाजमाध्यमांवरील झुंडींना देणेघेणे राहिलेले नाही, केवळ अर्धवट माहितीवर,सोयीसोयीने किंवा कोणालातरी खुश करण्यासाठी व्यक्त होताना आणि विखार पसरवताना आपण महाराष्ट्राचे किती नुकसान करत आहोत याचा विचार या झुंडी करणार नाहीतच,मात्र या झुंडींना आवार घालून 'कायदा सर्वांसाठी सारखा' आणि 'कायद्यापेक्षा मोठा कोणीच,अगदी कोणीच नाही' हे वास्तव समोर आणून सामाजिक सलोखा पुन्हा निर्माण करण्यासाठी आता तरी शासन,प्रशासनाने कठोरपणे आणि लोकप्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते आणि माध्यमांनी राजकीय,जातीय,व्यावसायिक फायद्या तोट्याच्या पलीकडे जाऊन व्यापक भावनेतून पुढाकार घेणे आवश्यक आहे.

Advertisement

Advertisement