बीड दि.१४ (प्रतिनिधी): पशुधन कमी होत असल्याचा परिणाम आपल्या शेतीवर होऊ लागला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीची कामे केली जात असल्याने पशुधनाचा उपयोग कमी होऊ लागला आहे.त्यासाठी पशुधन संवर्धन झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत माय आणि माती हेच आमचं व्हॅलेंटाईन असुन या कार्यक्रमाच्या माध्यमातून माय आणि माती यांच्याशी पुन्हा सांगड घालण्यासाठी मला या ठिकाणी निमंत्रित केले याबद्दल आभार अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळीत आयोजीत करण्यात आलेल्या महा पशुधन एक्स्पो या उपक्रमाचे कौतूक केले.
बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी या पशुधन एक्स्पोला भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले. परळी येथील ओपळे मैदानावर कालपासून सुरू असलेल्या महा पशुधन एक्स्पो कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. यावेळी मंत्री पंकजा मुंडे, आ.धनंजय मुंडे, रत्नाकर गुट्टे, नगराध्यक्ष पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, डॉ. रामस्वामी, प्रविणकुमार देवरे, नितीन पाटील, अक्षय मुंदडा, माजी मंत्री बदामराव पंडित, संजय दौंड, शंकर देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधिक्षक नवनीत काँवत आदिंची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे बहिण-भावासोबत महा एक्स्पो मधील वाहनात बसुन पशुधनाची पाहणी केली.

