बीड : राज्य निवडणूक आयोगाने अखेर राज्यातील जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून अपेक्षेप्रमाणे आरक्षण मर्यादेत असलेल्या १२ जिल्हापरिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या जिल्हापरिषदांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून निकाल ७ फेब्रुवारी रोजी लागणार आहे . विशेष म्हणजे जिल्हापरिषद निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात बीड जिल्हापरिषदेच्या समावेश नाही. त्यामुळे आता बीडकरांना जिल्हापरिषद निवडणुकांची अजूनही प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हापरिषद निवडणूक घेण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील १२ जिल्हापरिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यात रायगड,सिंधुदुर्ग,रत्नागिरी, पुणे,सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर,छत्रपती संभाजीनगर,धाराशिव,परभणी,लातूर या जिल्हापरिषदांचा समावेश आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार जिल्हापरिषद निवडणुकांची अधिसूचना १६ जानेवारी रोजी निघणार आहे, १६पासून २१ जानेवारी पर्यंत अर्ज स्वीकृती , २२ रोजी छाननी , २७ जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेणे, २७ रोजी चिन्ह वाटप आणि .५ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. मतमोजणी ७ फेब्रुवारीला होईल .

बातमी शेअर करा
