बीड दि.२७ (प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानातून अत्यंत निकृष्ट दर्जाच्या जवारीचे वाटप केले जात असल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते आणि माध्यमांनी समोर आणल्यानंतर आता उशिरा का होईना जिल्हा प्रशासनाचा 'विवेक ' जागा झाला आहे. स्वस्त धान्य दुकानांवरून वितरित होत असलेल्या ज्वारीचे वितरण थांबविण्याचे निर्देश आता जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत आणि जाहिरीच्या दर्जाबाबतचा अहवाल देखील मागविला आहे. मात्र मधल्या काळात नागरिकांच्या माथी जी निकृष्ठ ज्वारी मारली गेली त्याचे काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहणार आहे.
बीड जिल्ह्यात पणन विभागाच्या माध्यमातून त्यांच्याशी अंगीकृत संस्थांनी शेतकऱ्यांकडून हमी भावाने ज्वारीची खरेदी केली. ही खरेदी केलेली सुमारे ९० हजार क्विंट्टल ज्वारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून वितरित करण्यासाठी बीड जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांना देण्यात आली होती. मात्र सदरची जवारी ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर झाल्या. अनेक ठिकाणी नागरिकांनी ज्वारी घेण्यास नकार दिला. यात वंचित चे अजय सरवदे आणि इतरांनीही प्रशासनाकडे तक्रारी केल्या. माध्यमांनी ही बाब प्रकर्षाने समोर मांडली . अजय सरवदे यांनी तर काही स्वस्त धान्य दुकानांवरून जमवलेली ज्वारी थेट जिल्हाधिकाऱ्यांना दाखवली. जी ज्वारी जनावरे देखील खाणार नाहीत ती स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून नागरिकांच्या माथी मारण्याच्या या प्रकारात आता सर्व स्तरातून ओरड झाल्यानंतर प्रशासनाचा 'विवेक' जागा झाला असून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी 'त्या' ज्वारीचे वितरण थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आता त्या ज्वारीच्या दर्जाबाबतचा अहवाल मागविण्यात आला आहे.
केवळ भ्रष्टाचार नाही , तर जीविताशी खेळ
बीड जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत मालदांडी ज्वारी वितरित केली जात असून, तिचा दर्जा अत्यंत निकृष्ट व मानवी उपभोगास अयोग्य आहे. ही ज्वारी खाणे म्हणजे हळूहळू विष सेवन करण्यासारखी घाणेरडी आहे की पक्षांनाही खाण्यायोग्य नाही, अशी ही ज्वारी आहे. हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून, थेट भ्रष्टाचार आणि जनतेच्या जीवाशी खेळ आहे. आपण जर आज आवाज उठवला नाही, तर उद्या हा भ्रष्टाचार अधिक बळावेल. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्पष्ट आवाहन आहे की, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणारी ही ज्वारी कोणीही घेऊ नये.
अजय सरवदे, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी बीड (पश्चिम)

